लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच वैद्यकीय सेवाही अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे शासनाने साताऱ्याचे मेडिकल कॉलेज सुरू होण्यापूर्वीच मिरजेहून ३२ डॉक्टरांच्या टीमला जिल्हा शासकीय रुग्णालयात रुजू होण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आता सिव्हिलमधील डॉक्टरांवरील ताण कमी होणार असून रुग्णसेवाही आता चांगल्या प्रकारे दिली जाणार आहे. रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांची रुग्णवाहिनी म्हणून ओळखली जाते. या रुग्णालयांमध्ये रोज १ हजारहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येत असतात. त्यामुळे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर प्रचंड ताण पडत होता. यापूर्वी रुग्णालयामध्ये २६ डॉक्टर होते. या डॉक्टरांवर अगोदरच इतर रुग्णांची जबाबदारी होती त्यातच कोविड सुरू झाल्यापासून आणखीनच त्यांच्यावर जबाबदारी आली. रात्रंदिवस हे डॉक्टर रुग्णांची सेवा करत होते. आणखी मनुष्यबळ वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यावेळी गेल्या महिन्यामध्ये १२ बोंडेड डॉक्टर सिव्हिलमध्ये रुजू झाले. त्यामुळे तर आणखीनच सेवेला चांगला हातभार लागला. मात्र, सध्या कोरोनाची परिस्थिती आणखीनच चिघळत चालली आहे. त्यातच सध्या साताराच्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू नसले तरी मंजूर झालेले मनुष्यबळ सध्याच्या परिस्थितीला सिव्हिलच्या कामी येईल. हे ओळखून असणाऱ्या प्रशासनाने मिरजेहून ३२ डॉक्टरांची प्रतिनियुक्तीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात नियुक्ती केली आहे.
हे सर्व डॉक्टर येत्या दोन ते तीन दिवसांत सिव्हिलमध्ये रुजू होणार आहेत. हे डॉक्टर सिव्हिलमध्ये रुजू झाल्यानंतर एकूण डॉक्टरांचे मनुष्यबळ ७० होणार आहे. त्यामुळे आता ओपीडीपासून सर्व वाॅर्डमध्ये रुग्णांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा आता सातारकरांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
चौकट : साताऱ्याच्या महाविद्यालयासाठी ४३ डॉक्टर
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न शासकीय कोरोना रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) ३२ प्राध्यापक डॉक्टरांची साताऱ्यात नव्याने होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी दिले आहेत. त्यांच्या शिफारसीनुसारच त्यांची प्रतिनुियक्ती करण्यात आली आहे. सातारा येथे १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. त्यासाठी ५१० पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४३ डॉक्टरांच्या बदल्या सातारा येथील महाविद्यालयात करण्यात आल्या आहेत.
यामध्ये औषध वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, शरीररचनाशास्त्र, जीवरसायनशास्त्र विभागातील डॉक्टरांचा समावेश आहे.