सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असून आज, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेत १०६, नवजा येथे १३७ तर महाबळेश्वरला ११६ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात सुमारे १०४ टीएमसी साठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे साडे तीन फुटापर्यंत उचलून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातून एकूण ३२ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. पूर्व दुष्काळी भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. तर पश्चिम भागातील कास, नवजा, बामणोली, तापोळा, कोयना, महाबळेश्वर भागात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशा प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून दोन दिवसांपूर्वी विसर्ग सुरु करण्यात आलेला. त्यानंतर सोमवारी रात्री दरवाजे दीड फुटांनी उचलून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदाच दरवाजे उघडण्यात आले. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून बुधवारी सकाळी ११ पासून सहा दरवाजे साडे तीन फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. पायथा वीजगृह १०५० आणि दरवाजातून ३१,५३१ क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे कोयनेतून एकूण ३२,५८१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जूनपासून आतार्पंत कोयनेला ४,२४७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर नवजा येथे ५,१७४ आणि महाबळेश्वरला ५,४९२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर माण, खटाव, फलटण या तालुक्यातही पावसाची हजेरी आहे.
उरमोडीतून १९३४ क्यूसेक विसर्ग...उरमोडी धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. त्यातच धरणात ९.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण भरल्यातच जमा आहे. या धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास विद्युत गृहातून ५०० आणि सांडवा १४३४ असा एकूण १९३४ क्यूसेक विसर्ग सुरु होता.
वीरमधून १६ हजार क्यूसेक विसर्ग...पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला आहे. उजवा कालवा विद्युतगृह ११००, डावा कालवा विद्युतगृह ९०० क्यूसेक विसर्ग होत आहे. तर धरणाच्या सांडव्यातून मंगळवारी रात्रीपासून १३,९११ क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे वीर धरणातून एकूण १५,९११ क्यूसेक विसर्ग नीरा नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.