कोरेगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून कोरेगावात तीन टप्प्यांत घेण्यात आलेल्या ३१० अँटीजेन टेस्टमध्ये ३३ व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
बाधितांचे प्रमाण हे ११ टक्के असून, नगरपंचायत प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. बाधितांच्या आस्थापना शासकीय नियमानुसार बंद ठेवल्या जाणार आहेत. या संदर्भात मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सांगितले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाने पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी जिल्हाधिकारीशेखर सिंह व प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी शहरातील सर्वच व्यापारी व व्यावसायिकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील हुतात्मा स्मारक येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने तीन टप्प्यांत टेस्ट करण्यात आल्या.
पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या १९९ टेस्टपैकी केवळ एकच जण बाधित आढळला होता, त्यानंतर पुन्हा करण्यात आलेल्या १११ टेस्टमध्ये ३३ जण बाधित आढळले आहेत. बाधितांचे प्रमाण हे ११ टक्के असून, बाधितांच्या आस्थापना शासकीय नियमानुसार सात दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत. नगरपंचायत प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली असून, गुरुवारपासून कारवाई सुरू केली जाणार आहे.
ज्या दुकानांमध्ये मास्कचा वापर होत नाही, सामाजिक अंतर ठेवले जात नाही, अशांवर प्रथम प्राधान्याने कारवाई केली जाणार आहे. केवळ व्यवसायासाठी शहराला वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, त्यामध्ये कोणतीही हयगय होणार नसल्याचे घाडगे यांनी सांगितले.काळजी घेणे महत्त्वाचे कोरोना आता हद्दपारच झाला आहे, अशी शहरवासीयांची भावना तयार झाली आहे, अनेकजण लक्षणे असून देखील अंगावर दुखणे काढत आहेत, त्याचा फटका शहराला बसू लागला आहे. एकाचवेळी ३३ जण बाधित होणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. सारंग वाघमारे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी केले आहे.