रामापूर : पाटण तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर पाटण शहरातील सकल भागातील घरात आणि दुकानांत पाण्याचा शिरकाव झाल्यामुळे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर आंबवणे गावचा रस्ता वाहून गेला आहे.
पाटण तालुक्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. कोयनागनर भागात, तर धुवाधार सुरू आहे. यामुळे तालुक्यातील प्रमुख असलेल्या कोयना, केरा आणि मोरणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या नद्या नेहमीपेक्षा अधिक पातळीवरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी लहान ओढ्यावर असणाऱ्या पुलावरूनही पाणी वाहत आहे. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होण्याचा प्रकारही घडला आहे.
पाटण शहरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या चौकातील दुकानांत पाणी शिरले. यामुळे मोठे नुकसान झाले, तर शहरातील सकल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पाटण बसस्थानकातही चारी बाजूंना पाणी साचले होते.
दरम्यान, पाटण- चाफोली मार्गावर असलेल्या आंबवणे गावचा रस्ता पाण्याने वाहून गेला आहे, तसेच कऱ्हाड- चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अपूर्ण असलेल्या रस्त्यावर चिखल झाला आहे. त्यामुळे चालक कसरत करत वाहन चालवत होते.
फोटो दि. १७ पाटण आंबवणे फोटो...
फोटो ओळ :
पाटण तालुक्यातील आंबवणे गावाचा रस्ता ओढ्याच्या पाण्याने वाहून गेला आहे. (छाया : प्रवीण जाधव)