सातारा : शिरवळ, ता खंडाळा येथील रियटर कंपनीतील अचानक बडतर्फ केलेल्या बारा कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, यासह अनेक मागण्यांसाठी ३४८ कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कामगार आणि कुटुंबियांनी जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. रिएटर कंपनी प्रशासन व कामगार यांच्यामध्ये कामगार युनियनच्या मुद्द्यावरून गेले ४५ दिवस वाद सुरू आहे. कंपनीच्या कामगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, जिल्हा प्रशासन तसेच सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याकडे बाजू मांडली. परंतु, अद्याप या वादावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रिएटर कंपनीच्या ३४८ कामगारांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून भर उन्हात कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. आंदोलकांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युनियनच्या दोन पदाधिकाऱ्यांसह एकूण बारा कामगारांना तडकाफडकी कंपनीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई रद्द करावी. बारा कामगारांवर खोटे आरोप लावून केलेले निलंबन व चौकशी रद्द व्हावी. दहा कामगारांना खोटे आरोप पत्र देऊन सुरू करण्यात आलेली चौकशी थांबवावी. २० कामगारांची ट्रेनिंग व डेप्युटेशनच्या नावाखाली चंदीगढ व कोईमतूर येथे बदली करण्यात आली आहे, ती रद्द करावी, कामगारांना कामाच्या ठिकाणी दिली जाणारी अन्यायकारक वागणूक थांबवावी, अशा मागण्या कामगारांनी केल्या आहेत. कंपनी प्रशासनाने लवचिक पवित्रा घ्यावा आणि कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी योगेश खामकर व अध्यक्ष किरण गोळे यांनी केली आहे. तोडगा निघाला नाही तर तीव्र उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
विंगमधील रियटर कंपनीतील ३४८ कामगारांचे कुटुंबासह बेमुदत उपोषण, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
By दीपक देशमुख | Published: September 06, 2023 3:56 PM