शेखर जाधववडूज : जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, फलटण, दहिवडी, कोरेगाव व वडूज आगारातील नादुरुस्त व कालबाह्य ठरलेल्या एसटी बसेस भंगारमध्ये निघाल्या असून एका खासगी कंपनीने या बसेस लिलावात खरेदी केल्या आहेत. तर या बसेसची विल्हेवाट लावण्यासाठी वडूजमध्ये कारखाना उभारतोय.आपल्याला नेहमीच हवीहवीशी वाटणारी लाल परी, गरिबांचा रथ अशा नानाविध नावाने परिचित असलेल्या एसटी बसेसने आजपर्यंत अनेकांच्या सुख-दु:खात सहभाग नोंदवला आहे. सुखकर व खात्रीलायक प्रवास म्हणजे एसटीचा. हे महाराष्ट्रात ब्रीद वाक्यच बनले. त्याला कारणही तसेच आहे, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला हीच एसटी बस अनेकवेळा धावून आल्याचे किस्से आजअखेर ऐकिवात आहेत.
हीच एसटी बस कुटुंबातील घटक असल्याचे अनेकवेळा सिद्धही झाले आहे. वडूज आगारातील पटांगणावर एवढ्या मोठ्या संख्येने उभारलेल्या बसेस पाहणे वडूजकरांसाठी एक कुतूहलच बनले आहे. सध्या वडूज आगारातील बसेस लांब पल्ल्यावरच धावत आहेत.
यामध्ये निमसोड- मुंबई, वडूज-परेल, गारळेवाडी- परेल, मायणी-मुंबई, वडूज-नाशिक, वडूज-पुणेसह दैनंदिन सातारा दहा फेऱ्या सुरू आहेत. सध्या वडूज आगारात ५८ बस आणि बेस्ट उपक्रमातील चार बसेस सुसज्ज आहेत. मात्र, या कोरोना काळातील भलेमोठे संकट राज्य परिवहन महामंडळावर देखील कोसळले आहे.