लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. शासनाने रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली असून, जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार परवानाधारक रिक्षाचालकांना याचा लाभ होणार आहे.
गतवर्षी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनची जशी झळ बसली तशीच रिक्षाचालक व हातावर पोट असणाऱ्या अनेकांना याचा मोठा फटका बसला. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. हे करत असतानाच शासनाने गोरगरिबांच्या उदरनिर्वाहासासाठी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.
जिल्ह्यातील परवानाधारक साडेतीन हजार रिक्षाचालकांच्या खात्यावर शासनाकडून प्रत्येकी दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मात्र, ते पैसे कधी जमा होतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाढत्या महागाईत ही रक्कम अपुरी असली तरी दिलासा देणारी आहे. त्यामुळे राज्य शासनाने रिक्षाचालकांप्रमाणे इतर वाहनधारकांचा देखील मदतीसाठी प्राधान्याने विचार करावा, अशी अपेक्षा रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.
(कोट)
राज्य शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाने मदतीची घोषणा केली आहे. मदतीची रक्कम जरी अत्यल्प असली तरी ती लवकरात लवकर खात्यावर वर्ग व्हावी.
- विक्रांत पवार, रिक्षाचालक.
(कोट)
संचारबंदीची सर्वाधिक झळ रिक्षाचालकांना बसली आहे. सध्या व्यवसाय पूर्णत: बंद आहे. त्यामुळे घर खर्च चालविणे जिकिरीचे बनले आहे. राज्य शासनाने निधीची घोषणा केल्याने दिलासा मिळाला आहे.
- सचिन गंगावणे, रिक्षाचालक.
(कोट)
राज्य शासनाने केवळ घोषणा केली असली तरी निधीची रक्कम प्रत्यक्षात खात्यावर कधी वर्ग होणार याबाबत साशंकता आहे. स्थानिक प्रशासनाने मदतीची रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा.
- हरिदार यादव, रिक्षाचालक.
(पॉइंटर)
जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालक ३५००.