प्रत्येक जण आयुष्यात काही तरी बनण्याची संधी शोधत आहे. खरंतर ही संधी कुठेही शोधण्याची गरज नाही; कारण ती संधी प्रत्येकामध्ये आहे, हा विश्वास जोपासत प्रत्येक माणसाने कोणत्याही क्षेत्रात प्रयत्न केल्यास यश मिळतेच. हाच विश्वास सार्थ ठरवत शेतीला आपली जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून स्वीकारून शासकीय नोकरीचा त्याग करत गावच्या मातीत नोकरीतून आलेल्या अनुभव, ज्ञानाचा उपयोग करण्याचे काम देऊर, ता. कोरेगाव येथील कृषी पदवीधारक युवा शेतकरी देवेंद्र कदम करत आहेत. त्यांनी चायनीज भाज्यांचे उत्पादन घेतले आहे.देऊर येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले देवेंद्र कदम यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देऊर येथील मुधाई विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फलटण येथील मुधोजी कृषी विद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. कृषी पदविका पुणे येथील कॉलेज आॅफ अॅग्रिकल्चर या ठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर खरंतर त्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असतानाही घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षणाला रामराम करत नोकरीचा मार्ग स्वीकारला. राहुरी कृषी विद्यापीठातील प्रा. संभाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील शबरी कृषी प्रतिष्ठानमध्ये दीड वर्षे ५० एकर रायबोरीच्या बागेचे व्यवस्थापन केले.दरम्यान, १९९५ मध्ये भारतीय अनुसंज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राची निर्मिती झाली. यावेळी सोलापूर कृषीविज्ञान केंद्रात प्रोग्राम सहायक या पदावर १९९५ ते २०११ या काळात नोकरी केली. परंतु, नोकरी करतानाच मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या भागातील शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने त्यांनी नोकरीचा त्याग करून २०११ मध्ये देऊर गावात सातारा-लोणंद राज्यमार्गावर स्वत:ची भाजीपाला नर्सरी उभी केली. परंतु २०११ ते आजपर्यंत दुष्काळात नर्सरीचा उद्देश सफल झाला नाही. कोणत्याही क्षेत्राला मर्यादित न ठेवता नवनवीन संकल्पना राबवत देवेंद्र कदम यांनी नर्सरीच्या जोडीला लॅण्डस्केप गार्डनिंंगच्या कामात लक्ष घातले.लॅण्डस्केप गार्डन ही संकल्पना पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरात रुजली असताना ही संकल्पना आता सातारा जिल्ह्यातील खेडोपाडी पोहोचली आहे. देवेंद्र कदम हे लोणंद, फलटण, सातारा, खंडाळा येथील औद्योगिक वसाहतीत लॅण्डस्केप गार्डनचे काम करत आहेत. कदम यांनी शेतात चायनिज भाज्यांचे उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन घेताना त्यांनी शेतात ठिबक सिंचनबरोबरच मल्चिंग पेपरचा वापर केल्याने त्यांना याचा जास्त फायदा होणार आहे. ‘शेतीमध्ये अनेक रोजगाराच्या संधी आहेत, फक्त प्रत्येकाला त्या शोधता आल्या पाहिजेत,’ असे कदम आवर्जून सांगतात.-- संजय कदम
स्वत:च्या शेतासाठी सोडली ३५ हजार पगाराची नोकरी
By admin | Published: August 03, 2015 9:47 PM