सातारा : देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावर उद्या शुक्रवारी (दि. २०) रात्री मशाल महोत्सव साजरा केला जाणार आहे. गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यंदा ३६४ वर्ष पूर्ण झाल्याने ३६४ मशाली पेटवून हा महोत्सव साजरा होणार आहे. प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. शिवरायांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानीमातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना केली. या घटनेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटविण्यात आल्या. तेव्हापासून नवरात्रोत्सवात मशाली पेटविण्याची परंपरा सुरू झाली.यंदा भवानीमातेच्या प्रतिष्ठापनेला ३६४ वर्षे पूर्ण होत असल्याने किल्ल्यावर भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री आठ वाजता भवानीमातेच्या मंदिरापासून ते बुरुजापर्यंत ३६४ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावली आहे.
Satara: किल्ले प्रतापगडावर पेटणार ३६४ मशाली, महोत्सवाची तयारी पूर्ण
By सचिन काकडे | Updated: October 19, 2023 17:33 IST