सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीत पाच तालुक्यांतील ३७ जणांचा बळी गेल्याचे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले होते. तर पाटण तालुक्यातील भूस्खलनामधील ५ आणि वाई व जावळी तालुक्यातील पुरात बेपत्ता झालेल्या चौघा नागरिकांचा शोध सुरूच आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे सर्वाधिक बळी हे पाटण तालुक्यात गेले आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारपासून जोरदार पावसास सुरुवात झाली. त्याचबरोबर वारे वाहत होते. बुधवारी सायंकाळपासून तर धो-धो पाऊस कोसळत होता. आभाळ फाटल्यासारखी सर्वत्र स्थिती होती. गुरुवारी तर कोयना, नवजा येथे विक्रमी पाऊस झाला होता. त्यामुळे कोयना धरणात अवघ्या २४ तासात १६ टीएमसीहून अधिक साठा वाढला होता. या पावसामुळे भूस्खलन होऊन दरडी कोसळल्या. ओढ्यांतील पाण्याने पात्र सोडले. नद्यांना महापूर आला. तसेच अतिवृष्टीमुळे घरेही पडली. मागील चार दिवसांत २२ जुलैपासून अतिवृष्टीमुळे ३७ जणांचा बळी गेल्याचे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले होते. तर अन्य बेपत्ता असणाऱ्या काहींचा शोध सुरूच आहे.
दि. २१ जुलै रोजी वाई तालुक्यातील कोंढावळेतील वामन आबाजी जाधव (वय ६५) यांचा घराचे छत पडल्याने बळी गेला होता. तर दि. २२ जुलै रोजी कोंढावळे येथीलच राहीबाई मारुती कोंढाळकर (७५), भीमाबाई सखाराम वाशिवले (५२) यांचा भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला. महाबळेश्वर तालुक्यात दरड कोसळून विजय उर्फ अंकुश मारुती सपकाळ (२९, रा. घावरी) याचा मृत्यू झाला. दि. २३ जुलैला पुराच्या पाण्यात जावळी तालुक्यातील रेंगडी येथील तानाबाई किसन कासुर्डे (५०), भागाबाई सहदेव कासुर्डे (५०) यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील वैभव तायाप्पा भोळे (२२, रा. बोंद्री), जळव येथील तात्याबा रामचंद्र कदम (४७) यांचाही पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला. तर मंद्रुळकोळे, ता. पाटण येथील सचिन बापूराव पाटील (४२) यांचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला. २४ जुलै रोजी जावळी तालुक्यातील वाटंबेमधील जयवंत केशव कांबळे (४५), मेढा येथील कोंडिराम बाबूराव मुकणे (४५) यांचाही पुराच्या पाण्याने बळी गेला.
२४ जुलै रोजी भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी येथील रामचंद्र विठ्ठल कोळेकर (५५), मंदा रामचंद्र कोळेकर (५०), अनुसया लक्ष्मण कोळेकर (४५), सीमा धोंडिराम कोळेकर (२३), लक्ष्मी वसंत कोळेकर (५४), विनायक वसंत कोळेकर (२८), सुनीता विनायक कोळेकर (२४), विघ्नेश विनायक कोळेकर (६), वेदिका विनायक कोळेकर (३), मारुती वसंत कोळेकर (२१), आणि लक्ष्मण विठ्ठल कोळेकर (५०) यांचा मृत्यू झाला. पाटणमधीलच काहीर येथील उमा धोंडिबा शिंदे (१४) हिचाही बळी भूस्खलनामध्ये गेला.
पाटण तालुक्यातील रिसवड (ढोकावळे) येथील भूस्खलनामध्ये सुरेश भांबू कांबळे (५३), हरिबा रामचंद्र कांबळे (७५), पूर्वा गौतम कांबळे (३), राहिबाई धोंडिबा कांबळे (५०) यांचा मृत्यू झाला. तर पाटणमधील मिरगावमध्ये भूस्खलन झाल्याने ८ जणांचा बळी गेला. आनंदा रामचंद्र बाकाडे (५०), मंगल आनंदा बाकाडे (४५), भूषण आनंदा बाकाडे (१७), शीतल आनंदा बाकाडे (१४), यशोदा केशव बाकाडे (६८), वेदांत जयवंत बाकाडे (८), मुक्ता महेश बाकाडे (१०) आणि विजया रामचंद्र देसाई (६९) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. २४ जुलै रोजीच सातारा तालुक्यात पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू झाला. कुस बुद्रूक येथील सुमन विठ्ठल लोटेकर (६५) आणि अमन इलाही नालबंद (२१, रा. कोंडवे) अशी संबंधितांची नावे आहेत.
चौकट :
युध्दपातळीवर काम...
पाटण तालुक्यात भूस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचा शोध सुरूच आहे. अंदाजे अजूनही ५ लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी यंत्रणा जोरदार प्रयत्न करीत आहे. तर वाई आणि जावळी तालुक्यात प्रत्येकी दोघेजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचाही शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
.......................................................
चौकट :
भूस्खलनात २६, पुरात ८ जणांचा मृत्यू...
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भूस्खलन, दरड कोसळणे, पुरात वाहून गेलेल्यांचा समावेश आहे. भूस्खलनात सर्वाधिक २६, पुरात ८, दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर एका वृध्दाचा घराचे छत अंगावर पडल्याने बळी गेला आहे.
........................................................................