- दत्ता यादव
सातारा: जिल्ह्यात सध्या कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केले असून दररोज तीसहून अधिक जणांचा बळी जात असतानाच जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकेनी घेतलेल्या खबरदारीमुळे तब्बल ३७८ गर्भवती मातांनी कोरोनावर मात केली. या मातांची सर्व बाळ सुखरूप असून रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
जिल्ह्यात गत सहा महिन्यांपासून कोरोनाचा अक्षरशः हाहाकार सुरू आहे. शहरातील सर्व रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. हीच परिस्थिती जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्येही आहे. असे असताना प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलाही येऊ लागल्या आहेत. या महिलांची प्रसूतीपूर्वी कोरोना चाचणी केल्यानंतर संबंधित महिला कोरोनाबाधित आढळून येत होत्या. त्यामुळे डॉक्टरांच्या काळजाचा थरकाप उडत होता. गर्भवती मातेसह तिच्या बाळालाही धोका संभवण्याची परिस्थिती होती. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी या गर्भवती कोरोनावर कशा पद्धतीने मात करतील, यावर लक्ष केंद्रित केले.
औषधांपेक्षा मानसिक बळ या मातांना हत्तीचं बळ देऊन गेलं. रोज दहा-बारा गर्भवती महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात येतच होत्या. तर दुसरीकडे त्यांचे अहवाल कोरोनाबाधित येत होते. त्यामुळे प्रशासन अधिक चिंतेत होते. एका जीवाबरोबर दोन जीव वाचवण्याची धडपड डॉक्टरांची सुरू होती. सर्वात जास्त जबाबदारी ही रुग्णालयातील परिचारिकांची होती. तर रात्री-अपरात्री प्रसूतीसाठी आलेल्या माता आणि त्यांच्या बाळाची या परिचारिका काळजी घेत होत्या. त्यांना वेळेवर औषधी दिली जात होती. अधूनमधून त्यांचे अहवाल तपासले जात होते. त्यामुळेच या जीवघेण्या महामारीतून तब्बल दोनशे गर्भवती महिलांनी कोरोनावर मात केली. यामध्ये डॉ. सुनील सोनवणे डॉ. एस. पी. देसाई, डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. अतुल लिपारे, डॉ. सुधीर कदम, डॉ. अनिल राठोड यांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली.
बाळ व बाळंतीण सुखरूपगर्भवती मातांना आहाराबरोबरच वेळेवर औषधी आणि मानसिक बळ वारंवार देण्यात येत होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यास बाळाच्या जीवितास धोका होता, त्यामुळे एकही दिवस सुटी न घेता प्रत्येक मातेवर डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले. तुम्ही खंबीर राहा, डगमगू नका. यातून सहीसलामत बाहेर पडाल, असा धीर परिचारिका आणि डॉक्टरांनी गर्भवती मातांना वारंवार दिला.
सिव्हिलमधील डॉक्टर आणि नर्सनी कोरोनाची भीती घालवली. जन्मलेल्या बाळाची आणि स्वतःची कशी काळजी घ्यायची, हे त्यांनी शिकवले. कोरोनावर आम्ही कधी मात केली, हे आम्हाला समजलेही नाही. आमचा आणि आमच्या बाळाचा एक प्रकारे पुनर्जन्म झाला असून सिव्हिलमधील डॉक्टरांना आता आम्ही देव मानतो.- कोरोनामुक्त महिला सातारा.