लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त क्षय आणि कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत क्षयचे ३८७, तर कुष्ठरोगाचे २२१ रुग्ण आढळून आले. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या आजाराबाबत कोणाला लक्षणे जाणवल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे क्षय आणि कुष्ठरुग्णांचे निदान व त्यांना औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण अनेक वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी झालेले आहे. त्यामुळे सामाजील सर्व क्षय आणि कुष्ठरुग्णांचा शोध घेणे, आजाराचे निदान करणे आणि त्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार होणे महत्त्वाचे आहे. हाच हेतू ठेवून रुग्ण शोधण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार संयुक्त शोध अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले.
जिल्ह्यातील या अभियानात २ हजार ६५१ पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकाद्वारे जिल्ह्यातील २८ लाख ९४ हजार ३१६ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये क्षयचे ३६ हजार ६६९ संशयित आढळून आले. त्यामधील ३४ हजार ६७३ जणांची थुंकी तपसण्यात आली, तर २३ हजार १७१ संशयितांचा एक्सरे काढण्यात आला. यामध्ये ३८७ जणांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले. त्याचबरोबर याच पथकाने तपासणी केल्यानंतर कुष्ठरोगाचे १२ हजार ४०१ संशयित आढळून आले. यामध्ये एमबीचे १०८, तर पीबीचे ११३ असे एकूण २२१ रुग्ण स्पष्ट झाले.
जिल्ह्यात हे अभियान जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कुष्ठरोग विभागाचे डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
कोट :
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यात संयुक्त क्षय आणि कुष्ठरुग्ण शोधमोहीम अभियान राबविण्यात आले. याबाबत जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे. तसेच कोणा व्यक्तीत अशा आजाराची लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला माहिती देऊन या उपक्रमास सहकार्य करावे.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी
...............
जिल्ह्यात क्षय आणि कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. तसेच आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षणही करण्यात आले आहे. याला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांनी अशा आजाराबाबत लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्रात तपासणी करून औषधोपचार घ्यावा.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
.......................................................