कऱ्हाड : फायनान्स कंपनीत बनावट सोन्यावर कर्ज उचलून तसेच कर्जदारांनी कंपनीत ठेवलेले सोन्याचे दागिने गहाळ करून तब्बल ३९ लाख ३३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी चारजणांवर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संबंधित फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे.याबाबत मॅग फिनसर्व कंपनीचे एरिया मॅनेजर नासिर अली नौशाद अली बागवान यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सचिन युवराज शिंदे (रा. सिटी पोलिस लाईन, सातारा) याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅग फिनसर्व कंपनीची कऱ्हाडात शाखा आहे. या शाखेद्वारे गरजूंना सोने तारण कर्ज दिले जाते. संबंधित शाखेमध्ये सचिन शिंदे हा प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी करतो. कंपनीच्या नियमानुसार दर तीन ते सहा महिन्यांनी कंपनीचे अंतर्गत ऑडिट केले जाते. त्यानुसार खलिफ शेख यांनी ३ जुलै २०२३ रोजी कऱ्हाड शाखेचे ऑडिट केले असता त्यांना अपहार झाल्याचे आढळून आले.सचिन शिंदे याने अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून विविध कर्ज खात्यांमध्ये खोटे सोने ठेवल्याचे तसेच काही दागिन्यांचे जास्त मूल्यांकन दाखवून कर्ज वाटप केल्याचे ऑडिटर खलिफ शेख यांना आढळून आले. ही बाब खलिफ शेख यांनी कंपनीच्या निदर्शनास आणून दिली. शाखेतील सर्व व्यवहार तपासण्यात आले असता काही कर्जदारांनी कंपनीत तारण ठेवलेले सोने गहाळ झाल्याचेही निदर्शनास आले.त्यामुळे कंपनीच्या कऱ्हाड शाखेचा मॅनेजर सचिन शिंदे याच्यासह सोनार व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी मिळून कंपनीत ३९ लाख ३३ हजार १३९ रुपयांचा अपहार केल्याचे तसेच कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.