सातारा : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कायदा व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. शुक्रवारी पहाटेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत ३९७ केसेस करण्यात आल्या, तर ९६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून कायदा व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली होती. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही मोहीम राबविली. शहरातील राजवाडा, पोवई नाका, मोती चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मुख्य बसस्थानक परिसर, मोळाचा ओढा, गोडोली, जुने आरटीओ कार्यालय, वाढे फाटा येथे पोलीस तैनात होते.
दि. ३० डिसेंबरला वाहतूक नियंत्रण शाखेने मद्य प्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे, वाहतुकीचे नियम मोडणे अशा व्यक्तींवर कारवाई केली. जवळपास ६५० केसेसमधून १ लाख ५४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तसेच नववर्षाच्या पूर्वसंध्येलाही पोलिसांनी तीव्र मोहीम राबविली.
गुरुवार सकाळपासून ते शुक्रवारी पहाटेपर्यंत वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये एकूण ३९७ केसेस करण्यात आल्या. यामध्ये मद्य प्राशन करणाऱ्या १३ चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच तिघांचा वाहन परवाना निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विनाहेल्मेट जाणाऱ्या ३१ जणांवर कारवाई झाली. तसेच मालवाहतूक वाहन रस्त्यावर उभे करून वाहतुकीस अडथळा आणण्याऱ्या दोन वाहनांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
....................................................