कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायती निकालात राष्ट्रवादीची सरशी, उत्तर तांबवेत २२ वर्षांनंतर सत्तांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 07:15 PM2022-08-06T19:15:15+5:302022-08-06T19:15:59+5:30
७ पैकी ४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे, एक भाजपकडे, एक शिंदे गटाकडे, तर एका ग्रामपंचायतीवर स्थानिक गटाने विजय मिळविला आहे.
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ७ पैकी ४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे, एक भाजपकडे, एक शिंदे गटाकडे, तर एका ग्रामपंचायतीवर स्थानिक गटाने विजय मिळविला आहे. नाणेगाव बुद्रुक, शितळवाडी, पश्चिम उंब्रज आणि उत्तर कोपर्डे या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले असून, उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत तब्बल २२ वर्षांनंतर सत्तांतर झाले असून, ही ग्रामपंचायत पाटणकर गटाकडून, शंभुराज देसाई यांच्या ताब्यात गेली आहे. बेलवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वर्चस्व मिळविले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत शिंदे गटाने विजयी सलामी दिली. उत्तर तांबवे येथे जय हनुमान ग्रामविकास पॅनलने ४-३ असे सत्तांतर करत विजय मिळवला. शंभुराजे देसाई व रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील यांच्या गटाने एकत्रित चार जागा मिळवत सत्तांतर घडवले. त्यामध्ये रोहित बाबूराव चव्हाण, जयसिंग बंडू पाटील, शशिकांत रघुनाथ चव्हाण, विद्या सोमनाथ साठे, रूपाली संदीप पवार, बानुबी शौकत मुल्ला व भारती संदीप चव्हाण, अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत.
कोयना वसाहत ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी ७४ टक्के मतदान झाले. शुक्रवारी मतमोजणी झाली. दिवंगत सरपंच राजेंद्र पाटील विकास पॅनलने ११ पैकी १० जागांवर विजय मिळवत वीस वर्षांपासूनची भोसले गटाची सत्ता अबाधित ठेवली. एका अपक्षाला विजय मिळवता आला. विजयानंतर गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
बेलवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनलने पाच जागांवर विजय मिळवला. विरोधी जय हनुमान ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलला फक्त दोन जागा मिळाल्या. यामध्ये अमर रमेश बोबडे, वनिता संतोष संकपाळ, वनिता विनोद संकपाळ, अमोल विठ्ठल फडतरे, भारती दिलीप फडतरे, तसेच वैशाली बापूसाहेब फडतरे व प्रमोद भगवान गायकवाड हे उमेदवार विजयी झाले आहेत.
नाणेगाव बुद्रुकमध्ये संभाजी खाशाबा बोलके, दीपाली नवनाथ बोलके, नम्रता प्रल्हाद बोलके, वसंत बापू भोसले विजयी झाले. शितळवाडी ग्रामपंचायतीत प्रशांत प्रकाश बर्गे, किणी परशराम यादव, अरुण श्रीपती शितोळे, उज्ज्वला विश्वनाथ बर्गे, युवराज विठ्ठल शितोळे व अंजली संजय शितोळे हे उमेदवार विजयी झाले आहेत. पश्चिम उंब्रज ग्रामपंचायतीत प्रमोद रंगराव घाडगे, रेखा संतोष घाडगे, धनश्री संतोष घाडगे, शहाजी रंगराव घाडगे व अन्य दोन उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर कोपर्डे ग्रामपंचायतीच्या पाच जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दोन जागांवर सागर आनंदराव चव्हाण व बाळासाहेब अंतू चव्हाण हे विजयी झाले आहेत. या चारही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे.