लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१४ मध्ये तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडाचा गैरवापर करून ४६६ गाळ्यांची विनापरवानगी बांधकाम करून परस्पर विक्री केली आहे हा घोटाळा १३७ कोटींचा नसून ४ हजार कोटी रुपयांचा आहे असा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. तर आरोप सिद्ध केल्यास उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असे प्रत्युत्तर आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले आहे. येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शिंदे यांनी हा आरोप केला.
शिंदे पुढे म्हणाले, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या गैरव्यवहाराची माहिती आपण मांडली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती दिली त्यावेळी त्यांनी आपणास योग्य वाटेल ती भूमिका घ्यावी असे सांगितल्याचे शिंदे यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या शेती माल विक्रीसाठी ७२ हेक्टरचा भूखंड वितरित करण्यात आला होता . पैकी काही भूखंडावर ४६६ गाळे विनापरवानगी बांधण्यात आले. एक गाळा एक हजार स्क्वेअर फुट असून रेडी रेकनर प्रमाणे त्याची किंमत नऊ कोटी रुपये असताना हे गाळे पाच लाख रुपये किमतीने विकण्यात आले. हे गाळे तत्कालीन संचालक व व्यापारी यांनाच विकण्यात आले. प्राप्त माहितीनुसार एकाच कुटुंबामध्ये १३० गाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे .तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी त्यांनी पणन संचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. तत्कालीन संचालक प्रभू पाटील यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता त्यावेळी बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब सोळसकर संचालक शशिकांत शिंदे, प्रदीप खोपडे, संजय पानसरे, बापू भुजबळ ,यासह अन्य संचालकांनी हा घोटाळा केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
२०१३-१४ मध्ये सामाजिक कार्यकर्ते नितीन बोर्डे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती व अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते या प्रकरणात 138 कोटी रुपयांचा अपहार झाला असून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अशी शिफारस अहवालात करण्यात आली मात्र हा अहवालावर सुद्धा तत्कालीन संचालकांनी स्टे घेतला ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याची जागा उपलब्ध होती त्या ठिकाणी चटई क्षेत्रात गाळे बांधून त्यामध्ये चार हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे . हा केवळ बदनामीचा डावआरोप करणाऱ्यांनी जर हे आरोप सिद्ध केले तर आपण उमेदवारी देखील भरणार नाही. विरोधकांना आपला पराभव समोर दिसत असल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करू लागले आहेत. या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसून केवळ आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न आहे.शशिकांत शिंदे, आमदार, विधान परिषद