सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून गुरूवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे १६ तर महाबळेश्वरमध्ये ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, साताऱ्यात ढगाळ वातावरण असून पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात दोन दिवस धुवाँधार पाऊस झाला. यामुळे कोयनेसह प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झाला. पण, शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला. सध्या तर तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे अवघा १६ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून ८४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नवजाला २२ तर यावर्षी आतापर्यंत ९५१ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला जूनपासून १११८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर गुरूवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.४५ टीएमसी ऐवढा पाणीसाठा झाला होता. धरणात ५८३१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पायथा वीजगृहातील हे पाणी कोयना नदीपात्रात जाते.