सातारा : पुणे येथील बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा प्रबोधिनी स्पर्धेतून सातारा जिल्ह्यातून ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. राज्याभरातून ४७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यामध्ये चाळीस विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, चालना मिळावी, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. काही विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूंचे गुण असतात; मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना पुरेसा वाव मिळत नाही. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांनी क्रीडा प्रबोधिनीत सहभाग घेतला. यासाठी प्रत्येक शाळांमधून विद्यार्थ्यांच्या नऊ चाचण्या घेतल्या. यामध्ये वजन, उंची, लवचिकता, तीस मीटर धावणे, शटल धावणे, लांब उडी, उंच उडी, मेडिसिन बॉल थ्रो, आठशे मीटर धावणे, यामध्ये चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून यशस्वी विद्यार्थ्यांची केंद्र, बीट, तालुकास्तरावर चाचण्या घेण्यात आल्या. तालुकास्तरावर राज्य शासनाच्या पथकाने या चाचण्या घेतल्या. त्यातून जिल्हा परिषदेसाठी १६३ विद्यार्थी पात्र ठरले. त्यातून राज्यस्तरासाठी ६९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना म्हसवड येथे सोळा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सांगली येथे झालेल्या विभागीयस्तरावर ४५ मुलांची निवड झाली. त्यातून चाळीस विद्यार्थ्यांची निवड झाली. क्रीडा प्रबोधनीत सातारा झेंडा फडकावा, यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, जी. श्रीकांत, शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे, उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे, माजी शिक्षण सभापती संजय देसाई, नियोजन व मुख्य लेखाअधिकारी भारती देशमुख, शिक्षण विस्तराधिकारी संमती देशमुख, विकास भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)