सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उच्च शिक्षण घेऊन खासगी कंपन्यांमध्ये अनेक युवक नोकरी करीत आहेत. तर अनेकांची आजही नोकरीच्या शोधार्थ भटकंती सुरू आहे. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांपैकी तब्बल ४०० शेतकरी पदवीधर असून, त्यांनी नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य दिले आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन या शेतकºयांनी व्यवसायाचा नवा मार्ग स्वीकारला आहे.महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक आहे. ब्रिटिशकाळापासून या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. येथील भौगौलिक, नैसर्गिक परिस्थिती या पिकाला पोषक असल्याने गेल्या सात-आठ दशकात स्ट्रॉबेरी क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. यंदा तालुक्यात २ हजार ८०० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली असून, १ हजार ८५० शेतकरी या शेतीशी जोडले गेले आहे.एकीकडे स्ट्रॉबेरी उत्पादकांची संख्या वाढत असताना आता उच्चशिक्षित युवकही नोकरीऐवजी या शेतीकडे वळू लागले आहे. एकूण १ हजार ८५० स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांपैकी ४०० शेतकरी हे पदवीधर असून, अनेकांनी एमबीए, मॅकेनिकल इंजिनिअर, बीई अशा डिग्य्राही घेतल्या आहेत. शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अनेक शेतकरी कमी क्षेत्रातही स्ट्रॉबेरीचे अधिक उत्पादन घेत आहेत. काही शेतकºयांनी ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञनाच्या माध्यमातूनही स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. पदवीधर अनेक शेतकरी वर्षाला दोनशे ते तीनशे टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहेत. स्ट्रॉबेरी हे सहा ते सात महिन्यांचे पीक आहे. त्यामुळे हे शेतकरी उर्वरित कालावधीत पालेभाज्यांची लावगड नफा मिळवित आहेत.वार्षिक २०० कोटींची उलाढाल !तालुक्यातून दरवर्षी हजारो टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. दिल्ली, हैद्राबाद, बेंगलोर यासारख्या राज्यात तसेच विदेशातही स्ट्रॉबेरीची निर्यात केली जाते. स्ट्रॉबेरी खरेदी-विक्रीच्या माध्यामातून दरवर्षी सुमारे २०० कोटींची उलाढात होते, अशी माहिती महाबळेश्वर सहकारी फळे, फुले भाजीपाला खेरदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष किसनशेठ भिलारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.एकूण १८० पॉलिहाऊसमहाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही वर्षांत १८० पॉलिहाऊस उभारण्यात आले आहे. यासाठी शासनाने शेतकºयांना अनुदानही दिले आहे. पॉलिहाऊसच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीच्या एका रोपापासून सुमारे ५० नव्या रोपांची शाखीय वाढपद्धतीने निर्मिती केली जाते. तसेच अतिवृष्टीपासून रोपांचे संरक्षणही होते. पॉलिहाऊसच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.
स्ट्रॉबेरी उत्पादकांमध्ये ४०० शेतकरी पदवीधर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:06 AM