सातारा : जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असून जून ते जुलैदरम्यान ७२३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. दोन महिन्यात सरासरीच्या ४४ टक्के अधिक पाऊस बरसला आहे. तर यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात पाऊस कमी झाला असलातरी तरी इतर १० तालुक्यात जादा पर्जन्यमान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.२ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, यावर्षी जून महिन्यात मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. त्यामुळे जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली नाही. तरीही जूनमध्ये सुरूवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले होते. परिणामी चिंता वाढलेली. पण, जुलै महिनाच्या पहिल्या आठवड्यानंतर धुवाॅंधार पाऊस सुरू झाला. पूर्व तसेच पश्चिम भागातही धो-धो पाऊस झाला. यामुळे तलाव, धरणांतील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातच मागील १५ दिवसांत तुफान वृष्टी झाल्याने पावसाने वार्षिक सरासरीकडे आगेकूच केल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात जून ते जुलै या दोन महिन्यांत सरासरी ५०१.३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद होते. पण, प्रत्यक्षात ७२३ मिलिमीटर पाऊस बरसला. हे प्रमाण ४४ टक्के अधिक आहे. म्हणजेच दोन महिन्यात सरासरी १४४.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये १० तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला असल्याचे समोर आलेले आहे. तर जुलैपर्यंतची तुलना करता कऱ्हाड तालुका, फलटण आणि खटाव तालुक्यात २०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे.त्यातच अजुनही पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी जिल्ह्याचा पाऊसही वार्षिक सरासरी ओलांडणार हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने कोयनेसह बहुतांशी धरणे भरली नव्हती. यंदा मात्र, आताच ही धरणे ८० टक्क्यांवर भरली आहेत. त्यामुळे आॅगस्टमध्येच ही धरणे पूर्ण भरणार आहेत. त्यामुळे चिंता मिटणार आहे.
जून ते जुलै दरम्यानची पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)तालुका - पाऊस - अपेक्षित झाला - टक्केवारी
सातारा - ४५२.८ - ६८९.९ - १५०.६जावळी - ८३५.४ - १,२६८ - १५१.९पाटण - ९९०.९ - १,११७.८ - ११२.८कऱ्हाड - ३३५.२ - ६७४.४ - २०१.२कोरेगाव - ३५४.३ - ५२८.३ - १४९.१खटाव - १८९.६ - ४०३ - २१२.६माण - १७०.५ - ३०१.७ - १७७फलटण - १५४.९ - ३२९ - २१२.४खंडाळा - २०२.२ - २९२.८ - १४४.८वाई - ४०२ - ६३५.३ - १५८महाबळेश्वर - ३,१११.९ - २,४६८.३ - ७९.३
दुष्काळी तालुके आबादाणी..जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे प्रचंड दुष्काळी तालुके. गेल्यावर्षी या तालुक्यात कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ पडलेला. लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र, हे तालुके जुलैमध्येच आबादाणी झाले आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात दोन महिन्यात अधिक पाऊस झाला आहे.