नितीन काळेल ।सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणारं वॉटर कप स्पर्धेचं तुफान मंगळवारी संपत असून, मध्यरात्री बारापर्यंतच सहभागी गावांना काम करता येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांनी न थकता व उन्हाची पर्वा न करता श्रमदान केले आहे. हजारो लोकांच्या श्रमदानातून उभं राहिलेलं काम कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा वाढवून जाणारं ठरणार आहे.
अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून राज्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला प्रतिसाद अल्पसा लाभला; पण या स्पर्धेमुळे लोकांना पाण्याचे महत्त्व समजून आले. पहिल्यावर्षी जिल्ह्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे जिल्ह्याचा डंका सर्वत्र वाजला. वेळूचा आदर्श घेत जिल्ह्यातील इतर अनेक गावांनी दुसऱ्या वर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामधून डीपसीसीटी, नालाबांध, ओढ्यातील गाळ काढणे अशी कामे झाली. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. दुसऱ्या वर्षीही सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी स्पर्धेत क्रमांक मिळविला. या गावातील कामामुळे कोट्यवधी लिटरचा पाणसाठा होत आहे. त्यामुळेच जमिनीची पाणीपातळी वाढलीआहे. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावांना पाण्यासाठी टँकर सुरू करायला लागायचा. पाणीपातळी वाढल्याने अनेक गावांचे टँकर बंद झाले आहेत. ही सर्व किमया जलसंधारणाचीच आहे.
वर्षी तिसऱ्या स्पर्धेतही जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांतील दीडशेहून अधिक गावे सहभागी झाली आहेत. दि. ८ एप्रिलपासून संबंधित गावात श्रमदानाचं तुफान आलं होतं. पहाटेपासून रात्रीपर्यंत लोकांची कामे सुरू होती. मंगळवारी रात्री बारापर्यंतच स्पर्धेचं हे तुफान राहणारआहे. यावर्षीही या स्पर्धेंतर्गत जलसंधारणाचे मोठं काम झालं आहे.
अधिकाऱ्यांनी उचलले दगड...माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठं काम झालं आहे. याला कारण म्हणजे तालुक्यातील अधिकारी. माणमधील अनेक अधिकारी राज्यात कार्यरत आहेत. त्यांनी वॉटर कप स्पर्धेसाठी स्वत: श्रमदान केले आहेच. त्याचबरोबर कामासाठी आर्थिक सहकार्य करणे व ती मिळवून देण्याची जबाबदारीही घेतली. त्यामुळेच आज आंधळी, कुकुडवाड, बनगरवाडी (वरकुटे मलवडी) अशा अनेक गावांत जलसंधारणाचे काम मोठे झालेले आहे. या अधिकाºयांनी हातात टिकाव, खोरे, पाटी घेतली. तसेच त्यांनी उन्हात तळपत दगड उचलण्याचेही काम केले आहे.जैन संघटनेची मोठी मदत
जैन संघटनेच्या वतीने गेल्यावर्षीपासून वॉटर कप स्पर्धेतील गावांना मोठी मदत होत आहे. या संघटनेने यावर्षी जवळपास ३०० पोकलेन, जेसीबी उपलब्ध करून दिले आहेत. या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले आहे. या संघटनेमुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढला आहे. तसेच अनेक संस्था, दानशूर व्यक्तींनीही वॉटर कपच्या कामासाठी मोठी मदत केली.
गेल्या ४५ दिवसांपसून वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. मंगळवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील अनेक गावांनी स्पर्धेत सहभाग घेऊन परिसर पाणीदार करण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यातही चांगलं काम झालं आहे. याचा फायदा भविष्यात निश्चितच होणार आहे. - डॉ. अविनाश पोळ, प्रमुख मार्गदर्शक पाणी फाउंडेशन