मलकापूर : शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाती क्षेत्राच्या सुधारणा व दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ५५८ कोटी २४ लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी मलकापूर शहरातील तीन किलोमीटर नव्या उड्डाण पुलासाठी ४५९ कोटी ५२ लाखाचा भरघोस निधी मंजूर झाल्यामुळे मलकापूरचे रुपडेच पालटणार आहे.
कागल ते शेंद्रे महामार्गाच्या पट्ट्यातील पाच धोकादायक ठिकाणांच्या (ब्लॅक स्पॉट) दुरुस्ती व सुधारणांसाठी तब्बल ६४६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामधील पाचपैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्ह्यातील असून त्यामध्ये मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील नव्या उड्डाण पुलासाठी ४५९ कोटी ५२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मसूर फाटा येथील अंडर पास पुलासाठी ४७ कोटी १८ लाख, इंदोली फाटा अंडर पास पुलासाठी ४५ कोटी ३५ लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूस दीड कि.मी. अंतराच्या सर्व्हिस रस्त्यासाठी ६ कोटी १९ लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर कामांची अंमलबजावणी शेंद्रे ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्यात येणार आहे. अपघातांची मालिका वाढल्यापासून सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्यापरीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून, तसेच अनेकदा त्यांना प्रत्यक्ष भेटून, सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. शेंद्रे ते कागल अशा १३२ कि.मी. अंतरामध्ये मार्गाची झालेली दुर्दशा, त्यामुळे वाहतुकीसाठी निर्माण होत असलेली धोकादायक परिस्थिती, तसेच या पट्ट्यात होणारे अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी याकडे त्यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सर्वांच्या मागणीचा विचार करून मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री गडकरी यांचे सर्वांनी आभार मानले आहेत.
मागणी व पाठपुरावा सर्वांनीच केला. कसा का असेना, मलकापूर शहरातील तीन किलोमीटर लांबीचा पिलरवरील या पट्ट्यातील सर्वात मोठा उड्डाण पूल लवकरच तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा पूल तयार झाल्यास मलकापूर शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.
चौकट
मलकापूरला नवी मुंबईचा लूक
महामार्गाच्या सहापदरीकरणात मलकापुरात ११२ कॉलमवरील आधारित सहापदरी उड्डाण पूल. उड्डाण पुलाखाली दोन्ही बाजूला चार चार पदरी उपमार्ग बनवण्यात येणार आहेत. या मास्टर प्लॅनप्रमाणे रस्ते तयार झाल्यानंतर मलकापूरला नवी मुंबईचा लूक प्राप्त होणार आहे.