सातारा : जिल्हा बँकेसाठी तयार करण्यात आलेल्या कच्च्या मतदार यादीवर अंतिम ४६ हरकती नाेंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींवर बुधवारी (दि. १५) कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.
मयत मतदाराचे नाव आल्याबाबत १९, यादीत नाव नसल्याबाबत ५, राजीनामा दिला असल्याने २, प्रतिनिधींच्या नावावर आक्षेपाच्या ११ तर नावात दुरुस्तीबाबत ११, निवडणूक झाल्याने ५ व नावात दुरुस्तीबाबत ४ अशा एकूण ४६ हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. गट क्र. १साठी २७, गट क्रमांक २ साठी १, गट क्रमांक ३ साठी ७, गट क्र. ४ अ साठी ६, गट क्र. ४ ब साठी ५ अशा एकूण ४६ हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.
या हरकतींबाबत विभागीय सहनिबंधक कार्यालयाने संबंधित हरकत घेणारी व्यक्ती, संस्था यांना नोटिसा धाडल्या आहेत. या नोटिसा मिळताच हरकतींवरील सुनावणीबाबत हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. २२ सप्टेंबरपर्यंत हरकतींबाबत निकाल जाहीर केला जाणार असून, २७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
नोटिसा धाडल्या...
जिल्हा बँकेसाठी तयार केलेल्या कच्च्या मतदार यादीवर ज्यांनी हरकती नोंदवल्या आहेत, त्यापैकी सामान्य तक्रारी निकाली लावल्या जाणार आहेत. मात्र, ज्यामध्ये कागदपत्रे पाहण्याची गरज आहे, अशा प्रकरणात हरकतदार व ज्यांच्या विरोधात हरकती आहेत, त्यांना कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयात दि. १५ सप्टेंबर रोजी हजर राहावे लागणार आहे, अशी माहिती विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.