उंब्रज : राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, मित्रही नसतो. राजकाणात ‘विजय’ हे समीकरण करून बेरीज केली जाते. या समीकरणामुळे उंब्रज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विविध पॅनेलची निर्मिती झाली आहे. अपक्षही उभे राहिले आहे. सतरा जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.उंब्रज ग्रामपंचायतीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी पॅनेल तयार करण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यापासूनच सुरू होती. विजयी उमेदवार कोण होईल? याची चाचपणी सुरू होती. या प्रक्रियेत नेहमीप्रमाणे पक्षीय पॅनेल एकमेकांच्या विरोधात उभे राहतील, असे सर्वांनाच वाटत होते; परंतु अनेक नेत्यांमुळे पॅनेल उभे राहताना अनेक समीकरणे विस्कटली गेली. नवीन समीकरणे तयार झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उंब्रज विकास आघाडी, भैरवनाथ ग्रामविकास आघाडी, भैरवनाथ जनताविकास आघाडी, जनशक्ती ग्रामविकास पॅनेल या पॅनेलसह अपक्ष असे ४८ उमेदवार १७ जागांसाठी निवडणुकीच्या रणांगणात आहे.उंब्रज विकास आघाडी, भैरवनाथ ग्रामविकास आघाडी यांनी प्रत्येकी १७ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. तर भैरवनाथ जनताविकास आघाडीने ६ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर जनशक्ती ग्रामविकास पॅनेलने ३ उमेदवार उभे केले आहे. तर पाचजण अपक्ष उभे आहेत.४ पॅनेलसह अपक्ष उभे राहिलेले उमेदवार हे निवडणुकीच्या रणांगणात आहेत. कोणतेच पॅनेल पूर्णपणे एका पक्षाचे नाही. प्रत्येक पॅनेलमध्ये विजयी होण्याची समीकरणे डोळ्यांसमोर ठेवून बेरीज करण्यात आली आहे. पाठीमागील निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले आज एकत्र आहेत. तर एकत्र असलेले विरुद्धात आहेत. ही दहीमिसळ मतदारांना कशी पचतेय, यावर निकाल अवलंबून आहे. मागील निवडणुकीतील समीकरणे या निवडणुकीत पूर्ण बदललेत आहेत. मागील ग्रामपंचायती सदस्यापैकी १ ही जण यावेळी निवडणुकीला उभा नाही. परंतु त्या कुटुंबातील काहीजण उभे आहेत. (प्रतिनिधी)मतदारराजाचा कौल निर्णायकनिवडणुकीला सामारे जाताना उमेदवारांना आम्ही यापूर्वी काय केले, यानंतर काय करणार, याची उत्तरे घेऊन जावे लागते. सगळ्याच पॅनेलमध्ये पक्षीय दहीमिसळ असल्यामुळे उमेदवार मतदारांना केलेली विकासकामे कसे पटवून सांगतात. पुढील पाच वर्षांत काय करणार, हे समजावून सांगतील त्यावर मतदारराजा आपला विजयी उमेदवार ठरवलीत, हे मात्र नक्की.
१७ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात
By admin | Published: October 25, 2015 9:12 PM