लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीच्या काळामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आता जिल्ह्याला तब्बल ४९७ इंजेक्शन शासनाच्या माध्यमातून मिळाली असून, त्यांचे वितरण प्रशासनामार्फत विविध कोविड रुग्णालयांना करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर मिळावे, यासाठी अनेक स्टॉकिस्टकडे मागणी करीत होते. रेमडेसिविरचा काळा बाजारदेखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. काही जण हे इंजेक्शन जादा दराने विक्री करीत होते. कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचविण्यामध्ये अत्यंत उपयुक्त असे इंजेक्शन पुरवठ्याअभावी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होताना दिसत होती. तसेच रुग्णांचे नातेवाईकदेखील विविध ठिकाणी जाऊन रेमडेसिविर इंजेक्शन मिळेल का, याची चौकशी करीत होते. प्रशासनाकडेही त्याबाबतची मागणी वारंवार केली जात होती. आता ही गैरसोय दूर होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करीत असलेल्या जिल्ह्यातील ४३ रुग्णालयांसाठी गेल्या दोन दिवसांमध्ये ४९७ रेमडेसिविर इंजेक्शन अधिकृत वितरक सनी फार्मा यांच्याकडे पाठवून दिले आहेत. संबंधित रुग्णालयांनी या वितरकाकडून शासनाने ठरवून दिलेल्या किमतीमध्ये हे इंजेक्शन घेऊन जायचे आहे.
केंद्र शासनाच्या इंजेक्शनच्या वापराबाबतच्या सूचना आहेत, त्यानुसार अत्यावश्यक रुग्णांकरिता याचा वापर करावा, रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर वैद्यकीय व्यवसायिकांनी सर्रास करू नये, रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यापूर्वी शासकीय विहित नमुन्यातील फॉर्म भरून घेण्यात यावा. संबंधित रुग्णास मेडिकल स्टोअरमध्ये विक्री करण्यात यावी.
गैरवापर आढळून आल्यास कारवाई
इंजेक्शनचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर व विक्रीबाबतची कागदपत्रे जपून ठेवण्यात यावीत, तसेच या कार्यालयाच्या अधिकारी यांना तपासणीवेळी ती सादर करावीत. वर नमूद केलेल्या रुग्णालयांनी त्यांच्या नावासमोर अंतिम रकान्यात नमूद केलेल्या संख्येनुसार सनी फार्मा सातारा या वितरकांकडून इंजेक्शनची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.