नागठाणे : नागठाणे परिसरातील वळसे येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गावातील जवळपास ३० शेतकऱ्यांचा ४५ ते ५० एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वळसे येथील पालेकर कंपनीचे मागील शेतातील नारगौंडी भागातील विहिरीजवळ शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत जवळपास ३० शेतकऱ्यांचा ४५ ते ५० एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतू, वाऱ्यामुळे आगीची तीव्रता खूप जोराची असल्यामुळे आणि अग्निशमन बंबास शेतामध्ये येण्यास व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या महिन्यातच भरतगाव येथेही काही शेतकऱ्यांचा जवळपास १५ एकर ऊस आगीत जळाला होता. ही घटना ताजी असतानाच या महिन्यात पुन्हा अशीच भीषण घटना घडली आहे. या भीषण घटनेमध्ये वळसे येथील ३० शेतकऱ्यांचे मिळून ४५ एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचे स्पष्ट झाले असल्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
वळसे येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ५० एकर ऊस खाक, लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 7:02 PM