पाटण - पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची ऑक्सिजनचे बेडअभावी गैरसोय होऊ नये याकरीता पाटणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड वाढविण्यास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी आवश्यक निधी मंजूर करून दिला आहे. त्याबरोबरच येथील १०० ऑक्सिजन बेडबरोबर इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असणारा वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.
दौलतनगर (ता.पाटण) येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कोविड केअर सेंटरमध्ये उभारावयाच्या १० व्हेंटिलेटरच्या बेडच्या सुविधांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. कुराडे, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे आदींची उपस्थिती होती.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये ५० ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. वाढीवचे २५ ऑक्सिजन बेडचे काम पूर्ण झाले आहे तसेच १० व्हेन्टीलेटरच्या बेडची सुविधा येत्या आठ दिवसांत आपण कार्यान्वित करत आहोत.
ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये ३६ ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. पाटण तालुक्यात त्यामुळे एकूण २१०ते २१५ ऑक्सिजन बेड कार्यान्वीत होणार आहेत तर १० व्हेन्टीलेटरचे बेड कार्यान्वित करीत आहोत.
दौलतनगर व पाटण येथील उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी दोन दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार असून दौलतनगरला याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या तिन्ही उपचार केंद्रांकरीता अतिरिक्त डॉक्टर, नर्सेस व स्टाफ आवश्यक आहे. त्याप्रमाणे हा स्टाफ उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, सातारा यांना देण्यात आल्या आहेत
त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व औषधे ही उपलब्ध करून देण्याचे आदेशही जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची कसलीही गैरसोय पाटण तालुक्यात होणार नाही याचे नियोजन तालुका प्रशासनाने करावे, अशा सूचनाही देसाईंनी यावेळी बोलताना केल्या.
फोटो
पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड उभारणार याची घोषणा करून पाहणी करताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई.