सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षी सतत झालेल्या पावसामुळे आजही सर्वच धरणात चांगला पाणी साठा आहे. सद्यस्थितीत प्रमुख ६ धरणांमध्ये ४९.५८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षीही वेळेत पाऊस सुरू झाल्यास धरणे लवकरच भरतील, असा अंदाज आहे. तर सध्या कोयनेत ३१, उरमोडीत ६, धोम ५ तर तारळी धरणात ३ टीएमसीवर पाणी साठा शिल्लक आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हरफ्लो होतात, तसेच पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा धरणातून पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झालेला आहे. दोन वर्षांपूर्वी कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नद्या पात्र सोडून वाहत होत्या. त्यामुळे आजूबाजुच्या गावात आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. आताही पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यातच हवामान विभागाने मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल होईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस लवकरच सुरू होणार, असेच हे संकेत आहेत. त्यामुळे तलाव, धरणांत पाणी साठा वाढू शकतो, तसेच धरणे लवकर भरली जातील, असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणाची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी यावेळी या धरणात ५४.७६ टीएमसीचा पाणीसाठा होता. तर यावर्षी तो ४९.५८ टीएमसी इतका आहे. त्यामुळे अजूनही पाणीसाठा बऱ्यापैकी टिकून आहे, तर १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणातही अजूनही ३१.५० टीएमसी साठा आहे. म्हणजेच या धरणात अजूनही जवळपास ३० टक्के तरी पाणी आहे. त्याचबरोबर इतर धरणांमध्येही चांगला पाणी साठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
चौकट :
पूर्व भागातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा...
जिल्ह्यातील प्रमुख धरणांत शिल्लक साठा चांगला आहे. त्यामुळे यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यास आणि खंड न पडल्यास ऑगस्टमध्ये धरणे भरु शकतात, तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक तलावातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
चौकट :
जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)
धरणे यावर्षी गतवर्षी एकूण क्षमता
धोम ५.४१ ५.६९ १३.५०
कण्हेर २.७९ २.९० १०.१०
कोयना ३१.५० ३५.९० १०५.२५
बलकवडी ०.८३ १.२९ ४.०८
उरमोडी ५.९४ ६.५१ ९.९६
तारळी ३.११ २.४७ ५.८५
....................................................