वडूज : खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपंचायतींपैकी ५० गावांतील हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी येत नसल्याने व बाधित रुग्णांना उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. तत्काळ यावर नियंत्रण म्हणून तालुक्यातील ५० गावे प्रतिबंधित म्हणून प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत.
खटाव तालुक्यात आजअखेर १४ हजार १०४ बाधित रुग्ण, तर १२ हजार ६२० उपचार घेऊन घरी परतले आहेत. आजअखेर ४२० जणांना कोरोना आजारामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. ११७१ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यामधील बाधित रुग्ण मायणी, वडूज, औध, गुरसाळे, जिल्हा रुग्णालय व जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी उपचार घेत आहेत. खटाव तालुक्यातील कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होत आहे. त्यासाठी त्या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा गंभीर विचार करून व या रुग्णांच्या संपर्काचा संभाव्य परिसर म्हणून तालुका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र व त्याच्या आसपासचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संबंधित पोलीस ठाणे भागाच्या हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र सील करणे. त्या ठिकाणी चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित क्षेत्रातील नगरपंचायत व ग्रामपंचायती हद्दीमध्ये वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तूच्या सेवा व पुरवठा वगळता अन्य व्यक्ती यांना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. या झोनमध्ये फक्त मेडिकल व दवाखाने सुरू राहतील. तर इतर सर्व आस्थापना बंद राहतील. यादरम्यान प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांची आरोग्य विभागामार्फत आरोग्यविषयक तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारी सोडून आवश्यक ते कर्मचारी नियुक्तीचे आदेश तहसीलदार यांनी काढावयाचे आहेत. तर त्यांची कडक अंमलबजावणी गटविकास अधिकारी यांनी करावयाची आहे.
आगामी खरीप हंगामाची तयारी लक्षात घेता कृषी विषयक औषधे, बी-बियाणे, रासायनिक खते व औजारे यांची विक्री सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुरू राहील. तसेच ११ ते ५ घरपोच सेवा देण्यास ही परवानगी राहील. याचप्रमाणे दूध संकलन केंद्र सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७ या कालावधीत सुरू राहतील. बँक व पतसंस्था कामकाज सकाळी ११ ते २ या कालावधीत सुरू राहील. मात्र, या काळात कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन गरजेचे असल्याचे तालुका प्रशासनाने जाहीर केले.
__
चौकट
खटाव तालुक्यातील प्रतिबंधित गावे
वडूज, खटाव, औंध, कातर खटाव, एनकूळ, बुध, मायणी, नढवळ, बोंबाळे, कटगुण, खबालवाडी, पुसेगाव, सि. कुरोली, निमसोड, विसापूर, निढळ कातळगेवाडी, दातेवाडी, म्हासुर्णे, पुसेसावळी, कलेढोण, दरुज, चितळी, हिंगणे, गुरसाळे, शिरसवडी, वडगाव, चोराडे, राजाचे कुर्ले, तडवळे, वरूड, कळंबी, मोळ, खातगुण, डिस्कळ, भांडेवाडी, गणेशवाडी, पडळ, त्रिमली, अंभेरी, गोपूज, खरशिंगे,जाखणगाव, धोंडेवाडी, पळशी, जांभ, खातवळ, कणसेवाडी, पांढरवाडी, येरळवाडी.