सातारा : सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत दरमंजुरीचे ५१ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
कोरोनाचे सावट असल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने सर्व सभा, बैठका ऑनलाइन घेण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पालिकेची सर्व सभा ऑनलाइनच होत आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत दरमंजुरीच्या सर्व विषयांची सभा सचिव रंजना भोसले यांनी तपशीलवार माहिती दिली. काही विषयांवर समिती सदस्यांनी आपली मते नोंदविली. यानंतर सर्व ५१ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
विरोधी पक्षनेते अशोक मोने, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ऑनलाइनद्वारे सभेत सहभाग नोंदविला.