अशोक पाटील -इस्लामपूर -दक्षिण महाराष्ट्रातील नावाजलेला कृष्णा सहकारी साखर कारखाना मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणूनच सभासदांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलच्या हातात कारखाना सोपविला आहे. शनिवार दि. ११ जुलै रोजी कारखाना कार्यस्थळावर सर्व नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीत, सध्या कारखान्याकडे फक्त २२ लाख रुपये शिल्लक आहेत, त्यामुळे कामगारांच्या जुलै महिन्याच्या पगारासाठी लागणाऱ्या २ कोटी रुपयांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला. तसेच कारखान्यावर असलेल्या ५२0 कोटी रुपयांच्या कर्जाचे काय? यावरही वादळी चर्चा झाली.सध्या कारखान्यात कामगार किती आहेत, याची मोजदाद केली जात आहे. कामापेक्षा कामगारांचीच संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. या कामगारांना पगार देण्यासाठीही कारखान्याकडे पैसे नाहीत. सध्या कामगारांच्या पगारासाठी २ कोटींची रक्कम प्रत्येक महिन्याला लागते. परंतु कारखान्याकडे सध्या फक्त २२ लाख रुपये शिल्लक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर अध्यक्ष भोसले यांच्यासह सर्वच संचालकांना मोठा धक्का बसला.कारखान्यावर वेगवेगळ्या बँकांचे ३७१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. भविष्यात या कारखान्यास कर्ज मिळविण्यासाठी पूर्वीची कर्ज प्रकरणे नूतनीकरण करावी लागणार आहेत. परंतु ही प्रक्रिया किचकट आहे. तसेच कारखान्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसल्याने बँका कर्ज देतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.या बैठकीस माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह संस्थापक पॅनेलचे ५ संचालक उपस्थित होेते. या संचालकांना जितेंद्र पाटील, जगदीश जगताप, अमोल गुरव, दयानंद पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे अविनाश मोहिते यांनी बैठक सोडून जाणेच पसंत केले. यापूर्वी सर्व बँकांचे आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेतून होत होते. आता या बँकेनेही कर्जास नकार दिल्यास सहकार पॅनेलला स्वत:च्या कृष्णा बँकेचा आधार घ्यावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे कारखान्याकडे सभासदांना पुढचे बिल देण्यासाठीही पैसे नाहीत. साखरेला मागणी नसल्याने तीही पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामातही ऊस उत्पादकांना दर देणे अवघड होणार आहे. त्यामुळे भोसले यांनी, वायफळ खर्च कमी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.कामगारांची होरपळ..!सत्ता बदलल्यानंतर कामगारांवर उपासमारीची वेळ येत असते. यावेळीही तसाच प्रकार सुरु झाला आहे. नूतन अध्यक्षांनी हंगामी १५00 कामगारांना कमी केले आहे. यातून आपला कोण, परका कोण याची शहानिशा करुनच त्यांना कामावर पुन्हा घेण्याचे धोरण ठरले आहे.
कृष्णा कारखान्यावर ५२0 कोटींचा बोजा
By admin | Published: July 12, 2015 11:22 PM