सातारा : लोकसभेच्या मतदानाला केवळ चार दिवस बाकी असतानाच सुरूची राडा प्रकरणातील कार्यकर्त्यांना सातारा तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही राजेंच्या ५५ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरुची प्रकरणातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असणाºया अनेक कार्यकर्त्यांना गेल्या चार दिवसांपासून तडीपार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, ही कारवाई शुक्रवारी तीव्र करण्यात आली.
जवळपास १५० कार्यकर्त्यांना सातारा तालुक्यातून हद्दपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शनिवार दि. २० ते बुधवार दि, २४ रोजी सकाळपर्यंत सातारा तालुक्यात येण्यास कार्यकर्त्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मतदानादिवशी सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत त्यांना मतदानासाठी शहरात येण्यास मुभा देण्यात आली आहे. हे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी काढले आहेत.