पाचगणी : पाचगणी येथे टेबल लँड पॉर्इंटवर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग्या मोहळातील मधमाश्यांनी हल्ला चढवला. त्यात सुमारे ५५ पर्यटक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती की, नववर्षाच्या सुटीमुळे पर्यटकांची टेबल लँड पॉर्इंटवर पर्यटकांची गर्दी होती. दरम्यान, आग्या मोहळला धक्का लागल्याने पोळ्यावरच्या माश्या चवताळून उठल्या. त्यांनी पर्यटकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. माश्यांच्या चाव्याने घायाळ झालेले पर्यटक सैरावैरा पळत सुटले. वाचवा, वाचवा म्हणत पर्यटक वाट दिसेल त्यादिशेने धावत होते. यात सुमारे ५५ पर्यटक जखमी झाले. त्यामध्ये लहान मुले, महिलांचा समावेश होता. जमिला डांगे, जावेद डांगे, अविनाश चोपडे, हरिष कळंबे, राजू वन्ने, राहुल बगाडे, नीलेश मोरे, इमरान क्षीरसागर, प्रमोद शिंदे, बबन पातुकडे, अंबादास अक्कलकोटे, दिलीप कासुर्डे, वैभव वाडकर आदी कार्यकर्त्यांनी धूर करून पर्यटकांना मधमाश्यांच्या हल्ल्यातून सोडवून जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल केले. जखमींना तातडीने बेल एअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार करण्यात आले.