म्हसवड : म्हसवड शहरासह परिसरातील नव्वद नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यावर चाचणी केंद्रावर जाऊन कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यातील ५६ जणांचे अहवाल बाधित आले. रुग्णवाढीत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
माण तालुक्यातील म्हसवडसह इतर गावांतही कोरोना संसर्गाचा प्रभाव कडक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पालिका व पोलीस विभागाच्या वतीने शासन आदेशानुसार म्हसवड शहरातील व हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद केले. सर्व रस्ते नाकाबंदी केले तरी रुग्णसंख्या वाढत आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवत आहेत.
म्हसवड शहर आणि परिसरातील ५६ नागरिक बाधित आढळून आलेत. ९० टेस्ट पैकी ५६ बाधित झाल्याने म्हसवडकरांनी उभारलेले लोकवर्गणीतील डीसीएससी कोरोना सेंटर व आरोग्य विभागाचे सीसी सेंटरच्या तिन्ही इमारती क्षमतेपेक्षा जादा रुग्ण झाल्याने हाऊसफुल्ल झाल्या आहेत. सोमवार, १९ रोजी झालेल्या तपासणीत हा अहवाल आला आहे.
येथील कोरोना सेंटरमध्ये ९० टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी ५६ टेस्ट बाधित आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित होण्याची पहिलीच घटना आहे.
म्हसवड शहरातील शिक्षक काॅलनी, देवांगनगर, बाजार पटांगण परिसर मुख्य पेठेतील कापड दुकानदार परिसरातील २८ नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत.
चौकट :
ऑक्सिजनचे बेड मिळेनात
कोरोना सेंटरमधील तिन्ही इमारतीत बाधित नागरिकांना उपचारासाठी दाखल केले आहे. ऑक्सिजनचे १६ बेडही फुल झाले असून जिल्ह्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. मायणी, कोरेगाव, सातारा, कऱ्हाड, वडूज, फलटण, अकलूज येथेही बेड शिल्लक नसल्याने बाधित रुग्णांचे उपचाराविना हाल होताना दिसत आहेत.