सातारा : सातारा पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. सदर बझार येथे उभ्या राहणाऱ्या आठ मजली इमारतीसाठी सुमारे ६० कोटींचा खर्च अपेक्षित असून, राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीतून हा निधी प्राप्त करण्याचे सूतोवाच खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत.
सातारा शहराची वाढती लोकसंख्या, हद्दवाढ आदींचा विचार करून सुमारे दोन वर्षांपूर्वी सातारा पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचा विषय चर्चेस आला. या इमारतीसाठी बाबासाहेब तांबोळी यांनी सदर बझार येथील एक एकर जमीन विनामोबदला पालिकेला दिली आहे. नियोजित इमारतीत एकूण आठ मजले असून, त्यातील सहा मजल्यांवर प्रशासकीय कामकाज चालणार असून, खालील मजल्यांवर वाहनतळ असणार आहे. सातारा पालिकेने जागेचे मोजमाप केले असून, प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम आराखड्यालाही मंजुरी मिळाली आहे.
या आराखड्यानुसार इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे ६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या आवश्यक खर्चाच्या निधीकरिता राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण, नावीन्यपूर्ण विकासकामे या योजनेखाली तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारीतून विशेष बाब म्हणून भरीव निधी प्राप्त करून घेतला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी आणि लोकोपयोगी प्रशासकीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ लवकरच होईल, असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. सातारा विकास आघाडी ही सातारकरांची आघाडी आहे. सातारकर आणि साविआ म्हणजे जीवा-शिवाची गाठ-भेट आहे. सातारचा आणि सातारकरांचा विकास साविआमध्ये सामावलेला आहे. म्हणूनच स्वप्नपूर्तीत नव्हे तर आश्वासन, वचनपूर्ती किंवा दिलेल्या शब्दाला जागल्याचे एक वेगळे समाधान आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
फोटो : १८ प्रशासकीय इमारत