कराड,
कृष्णा कारखान्याच्या इतिहासात सभासदांना दरवर्षी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर देण्याचा ऐतिहासिक निर्णय जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने घेतला व राबविला. आता सभासदांना ही ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा सहकार पॅनेलचे प्रमुख डाॅ. सुरेश भोसले यांनी केली.
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील जाहीर सभेत डाॅ. सुरेश भोसले बोलत होते. यावेळी माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संजय पाटील, जे. डी. मोरे, जितेंद्र पाटील, सुजीत मोरे, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, भगवानराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, आम्ही २०१५ साली जेव्हा सत्तेवर आलो तेव्हा कारखान्याची स्थिती फारच बिकट होती; पण सगळ्या संकटातून मार्ग काढत आज आम्ही कारखाना सुस्थितीत आणला आहे. गेल्या ५ वर्षात सरासरी ३००० रुपयांपेक्षा जास्त दर आम्ही सभासदांना दिला आहे. डिस्टीलरी चांगली चालविली आहे. कृषी महाविद्यालयाची सुसज्ज इमारत साकारून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. नवा इथेनॉल प्रकल्प साकारला आहे. भविष्यात त्याठिकाणी दररोज १ लाख लिटर उत्पादन करणार इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आमचा इरादा आहे.
याउलट विरोधकांनी गैरव्यवहारांव्यतिरिक्त दुसरे काहीही केले नाही. खोट्या सह्या करून त्यांनी उचललेले ५८ कोटींचे कर्ज आता व्याजासह १०० कोटींचे झाले असून, त्याला संपूर्णत: त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहे. तर दुसरे एक विरोधक ज्या पतसंस्थेचे मार्गदर्शक आहेत, त्या पतसंस्थेतून लोकांच्या ठेवी मिळेनाशा झाल्या आहेत. अशा बेजबाबदार लोकांच्या हातात आपण सत्ता देणार आहोत का? असा सवाल करत, कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनेललाच साथ द्या, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
संस्थापक पॅनेलच्या कारभारावर टीका करताना ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले की, अविनाश मोहिते हे अपघाताने तयार झालेले नेतृत्व आहे. कारखाना चालवायला या माणसाने एक ‘बाबा’ नेमला. तो एवढा हुशार की त्याने मनोमिलनच होऊ दिले नाही. खरंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा या निवडणुकीशी काहीही संबंध नसताना ते यात का उतरले होते, हे समजायला कारण नाही. संस्थापक पॅनेलचे नेते जेव्हा मते मागायला येतील, तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जेलमध्ये का गेला होता? हा कारखाना सक्षमपणे चालविण्याची धमक फक्त डॉ. सुरेश भोसले यांच्यामध्येच असून, कारखान्याला वैभव मिळवून देण्यासाठी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करा.
चौकट
अतुल भोसलेंच्या मागणीला मिळाली प्रचंड दाद..
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सभासदांना दिलेले मोफत साखरेचे वचन पाळले आहे. आता पुन्हा सत्तेवर आल्यावर सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी सर्व सभासदांना दिली जाणारी मोफत साखर घरपोच द्यावी, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांना सभेत केली. त्यांच्या या मागणीला सभेतून जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनी सहकार पॅनेल सर्व सभासदांना मोफत साखर घरपोच देईल, अशी घोषणा केल्यावर सभासदांनी मोठ्या उत्साहात याचे स्वागत केले.
फोटो ओळी :
रेठरे हरणाक्ष (ता.वाळवा )येथील प्रचार सभेत बोलताना डाॅ. सुरेश भोसले