पिंपोडे बुद्रूक : जिल्ह्यात गेले अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या ९ सहकारी व ६ खासगी मिळून १६ कारखान्यांकडून मिळून ६० लाख ९२ हजार ३०१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून सरासरी ९.७७ उताऱ्यानुसार ५९ लाख ५४ हजार ३५६ क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे.चालू वर्षी अंत्यत कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या परिसरात ऊस वाळू लागले आहेत. याचा परिणाम साखर उताऱ्यावर झाल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यात साखर उताऱ्यात खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी साखर कारखाने आघाडीवर आहेत. सहकारी नऊ कारखान्यांनी आतापर्यंत ३१ लाख ११ हजार १६० टन उसाचे गाळप करत ३३ लाख ७३ हजार ८७० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांना सरासरी १०.८४ टक्के साखर उतारा मिळाल्याचे अहवालावरून दिसत आहे, तर खासगी सात कारखान्यांनी आतापर्यंत २९ लाख ८१ हजार १४१ टन उसाचे गाळप करत २५ लाख ८० हजार ४८७ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. खासगी कारखान्यांना सरासरी ८.६६ टक्के उतारा पडला आहे.दरम्यान, दिवसेंदिवस पाण्याचे संकट अधिक गडद होऊ लागल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ऊसतोडणीची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांची हीच दुखरी नस ओळखून ऊसतोड यंत्रणांकडून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची प्रकरणे उद्भवत आहेत.
दिवसेंदिवस निर्माण होणारी पाणीटंचाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणीसाठी लगबग सुरू आहे. याची दखल घेत शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, अथवा गैरसोय होऊ नये याबाबत कारखान्यांकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी ऊस तोडणीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. -जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, अजिंक्यतारा कारखाना
दिवसेंदिवस पाणी पातळीत विलक्षण घट होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे उसाच्या वजनात घट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कारखाना व्यवस्थापनाने ऊस तोडणीसाठी पाणीटंचाई भागात प्राधान्य देण्याची गरज आहे. -शंकरराव गोडसे, कार्याध्यक्ष शेतकरी संघटना किसान मंच