सातारा : संचारबंदीचे नियम कठोर करण्यात आले असले तरी पालिका प्रशासनाकडून नागरिकांना घरपोच फळे, भाजीपाला, दूध व किराणा साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. याकामी पालिकेने शहरातील तब्बल ६०० विक्रेत्यांना व्यवसायासाठी परवाना देण्यात आला आहे.
जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. ४ ते १० मे या कालावधीत संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले आहेत. या कालावधीत मेडिकल व रुग्णालयवगळता अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, किराणा, दूध, भाजीपाला, फळे अशा अत्यावश्यक वस्तू ७ ते ११ या वेळेत घरपोच उपलब्ध करण्यास मुभादेखील देण्यात आली आहे.
सातारा पालिकेने यासाठी भाजीपाला, किराणा व फळ विक्रेत्यांसह एकूण ६०० जणांना व्यवसायाचा परवाना दिला आहे. हे विक्रेते नियमांचे पालन करून सातारकरांना अत्यावश्यक सेवा घरपोच उपलब्ध करत आहेत. विक्रेत्यांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्याचे संबंधितांनी पालन करावे. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले अथवा विनापरवाना व्यवसाय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
(चौकट)
पालिका प्रशासनाने परवानाधारक दूध, फळे, भाजीपाला विक्रेत्यांची यादी तयार केली आहे. संबंधितांनी शहरातील कोणत्या भागात विक्री करावी व करू नये याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. निर्धारित केलेल्या भागात सेवा देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी
(चौकट)
परवानाधारक विक्रेते
किराणा - २१०
भाजीपाला, फळे - ३१०
दूध - ५५
इतर - २५