सातारा : सातारा बाजार समितीच्या १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६१ अर्ज दाखल झाले. आमदार गटासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांनी उपनिबंधक कार्यालयात येऊन अर्ज दाखल केले. खासदार उदयनराजे भोसले गट, तसेच राष्ट्रवादीतील कुणी अर्ज भरले, हे छाननीमध्येच स्पष्ट होणार आहे.सातारा समितीत सोसायटी ११, ग्रामपंचायत ४, व्यापारी २ आणि हमाल-मापाडी १ अशा १८ जागा आहेत. या जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६१ अर्ज दाखल झाले. यामध्ये सेवा संस्था गटातील अर्ज असे : शेतकरी सर्वसाधारण २४, महिला सर्वसाधारण ५, इतर मागासवर्ग २, विमुक्त जाती-भटक्या जमाती ३ अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारणमधून १०, अनुसूचित जाती-जमाती ४, आर्थिक दुर्बल ३ अर्ज दाखल झाले. हमाल-मापाडी मतदारसंघात २, तर व्यापारी मतदारसंघ ८ अर्ज दाखल झाले. अर्जांची छाननी बुधवारी (दि. ५) रोजी आहे, तर अर्ज माघारीची मुदत दि. २० पर्यंत आहे.अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सातारा तालुका उपनिबंधक कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. दुपारी दीडच्या सुमारास आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थकांसह या ठिकाणी आले. एकाचवेळी आमदार गटाच्या उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरले. यानंतर स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारांनीही अर्ज भरले. खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मात्र गुलदस्त्यात असून, त्यांच्यातील कोणी अर्ज भरले, हे छाननीनंतरच स्पष्ट होणार आहे.मतदारसंख्या▪️ सोसायटी १७७९▪️ ग्रामपंचायत १५८४▪️ व्यापारी ९८३▪️ हमाल-मापाडी ५३
सातारा बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६१ अर्ज, बुधवारी छाननी
By दीपक शिंदे | Published: April 04, 2023 5:05 PM