सातारा : राज्यात सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ६१ तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यामधील सर्वच शेतकऱ्यांच्या बांधावर तक्रार निवारण समितीने जाऊन पाहणी केली. यामधील १० शेतकऱ्यांना संबंधित दुकानदारांकडून बदलून बियाणे देण्यात आले. उर्वरित ५१ तक्रारधारकांना पैसे मिळण्याची शक्यता असून, यात सर्वाधिक तक्रारी कऱ्हाड तालुक्यातील आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामातील क्षेत्र ३ लाख हेक्टरहून अधिक आहे. सोयाबीन, भात, बाजरी आणि ज्वारी ही पिके या हंगामात मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. तर खरिपात सोयाबीनचे क्षेत्र ५० हजार हेक्टरच्या आसपास आहे. बहुतांशी शेतकरी या खरीप हंगामावरच अवलंबून असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने हा हंगाम महत्त्वाचा ठरतो. खरिपात शेतकऱ्यांची बियाणे आणि खताबाबत फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. या अंतर्गत कृषी दुकानांची तपासणी करून कारवाईही करण्यात आली आहे.मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली होती. सोयाबीनचीही पेरणी सुरू आहे. पण, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या. आतापर्यंत ६१ तक्रारी आल्या असून, यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक ३३आहेत. साताऱ्यांतील १७ आहेत. तर वाई तालुक्यातून १० तक्रारी आल्या.
सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार येताच कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून माहिती घेतली. त्यातील १० जणांना बियाणे बदलून देण्यात आले आहेत. पूर्वी घेतलेल्या दुकानातूनच हे बियाणे कृषी विभागाने मिळवून दिले.
५१ तक्रारीबाबत सबंधित कंपनी कार्यालयाला प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पैसे मिळतील. तर चार ठिकाणच्या केसेस कोर्टात सादर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.खोलीवर बियाणे...उन्हाळा झाल्यानंतर यावर्षी लवकर पाऊस झाला. शेतकऱ्यांनी आणखी पावसाची वाट न पाहता सोयाबीनची पेरणी केली. असे असलेतरी उष्णतेत सोयाबीन उगवत नाही. त्यामुळे उगवण नसल्याच्या तक्रारी सुरुवातीला आल्या. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने पेरणी केलेल्या ठिकाणचे बियाणे खोलवर गेले. तेथील बियाणे उगवणीला मार बसला. पण, बैलांच्या साह्याने पेरणी झालेल्या ठिकाणी सोयाबीन उगवण चांगली झाल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.