दत्ता यादव ।सातारा : स्वत:ची जागा असूनही घराचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होत नाही. असे असताना ज्यांना घर बांधण्यासाठी जागाच नाही, अशा लोकांची काय अवस्था असेल. मात्र, अशा भूमिहिनांना आधार मिळालातो पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेचा.या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६२ भूमिहिनांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून जागा मिळण्यासाठी अनेकजण प्रशासनाचे उंबरठे झिजवत होते. त्यांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, पंडित दिन दयाळ उपाध्याय घरकुल योजनेच्या माध्यमातून या भूमिहिनांना घराची अशा पल्लवीत झाली.
५०० क्वेअर फुटाची जागा खरेदीसाठी शासनाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे भूमिहिनांना मोठा आधार मिळाला आहे. हक्काची जागा नसल्यामुळे अशा भूमिहिनांना स्थानिक पातळीवर अनेक अडचणी येत असतात. त्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न यावरही मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे शासनाने भूमिहिनांसाठी जागा खरेदी करून त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात एका वर्षात ६२ जणांना जागा खरेदी करून देण्यात आली आहे.
भूमिहिनांना जागा मिळावी, यासाठी शासनाकडूनच प्रयत्न केले जात आहेत. मात्र, हेवेदावेआणि स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जागा मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जागेचा व्यवहार झाल्यानंतर संबंधित जागेची कागदपत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे देण्यात येतात. त्यानंतरच संबंधित लाभार्थ्याला ५० हजारांचे अनुदान दिले जाते. या अनुदानामध्ये लाभार्थ्याला घराची संपूर्ण जागा खरेदी करता येत नसली तरी शासनाकडून मिळत असलेला हा आधार लाख मोलाचा आहे.आम्हाला अनुदान वाढवून हवं...सध्या महागाई गगनाला भिडली आहे. जमिनीच्या गुंठ्याचे दरही लाखात आहेत. तसेच जागा खरेदी करणेही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून शासनाने घराच्या जागेसाठी ५० हजारांचे अनुदान दिले आहे. मात्र, सध्या जमान्यात ५० हजार पुरेसे नाहीत. त्यामुळे हे अनुदान वाढवून मिळावे, अशी मागणी भूमिहिनांकडून होत आहे.
मी दहा वर्षांपासून घराची जागा मिळण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र, स्थानिक पातळीवर अनेक अडचणी निर्माण होत होत्या. झेडपीतील अधिकाºयांनी संबंधितांची समजूत घातल्यानंतर आम्हाला घर बांधण्यासाठी जागा मिळाली.-नारायण जाधव, लाभार्थी