कऱ्हाड : कऱ्हाडसह पाटण तालुक्याच्या वनक्षेत्राबरोबरच शिवारातही प्राणी व पक्ष्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. या टोळ्यांनी गत तीन वर्षात २४ प्राणी व पक्ष्यांची शिकार केली असून ‘ओली पार्टी’ करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे त्या-त्यावेळी उघडकीस आले आहे.
विंग येथील शिवारात शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने प्राण्यांची शिकार करणाऱ्या दहाजणांच्या टोळीला रविवारी वन विभागाने बेड्या ठोकल्या. यापूर्वीही अशी कारवाई झाली आहे. मात्र, कारवाई होऊनही वारंवार अशा टोळ्या प्राण्यांचे बळी घेतात. वनक्षेत्रासह गावोगावच्या शिवारात अशा शिकाऱ्यांची वर्दळ असते. रानामाळात वावरणाऱ्या लहान प्राण्यांची ते शिकार करतात. तसेच पक्ष्यांनाही बंदुक अथवा इतर साधनांच्या साहाय्याने मारले जाते. वास्तविक, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात वनक्षेत्र जास्त आहे. तसेच शिवारही बागायत आहे. खाद्याच्या उपलब्धतेमुळे या शिवारात अनेक प्राणी व पक्ष्यांचा वावर असतो. अशी ठिकाणे हेरून त्याठिकाणी शिकाऱ्यांकडून जाळी लावली जात आहेत. त्या जाळ्यांमध्ये प्राणी व पक्षी अडकतात. सायंकाळच्या वेळेस शिकारी पुन्हा त्याठिकाणी येतात. जाळ्यात सापडलेले प्राणी व पक्षी त्यांच्याकडून मारले जातात आणि त्याचीच ‘ओली पार्टी’ करतात.
काहीजण हौसेखातर हा प्रकार करीत आहेत; पण या मांसाला जास्त मागणी असल्याने काहीजण विक्रीच्या उद्देशाने प्राणी व पक्ष्यांची शिकार करीत आहेत.
- चौकट
तीन वर्षात २१ गुन्हे
दिनांक : गुन्हा : आरोपी
१ ऑगस्ट २०१८ : कऱ्हाड : १
११ ऑगस्ट २०१८ : पाटण : १
२६ ऑक्टोबर २०१८ : कळंबे : १
२९ नोव्हेंबर २०१८ : जळव : १
१९ डिसेंबर २०१८ : काहीर : ३
१८ जानेवारी २०१९ : सळवे : १
२० मार्च २०१९ : नांदगाव : ३
२४ नोव्हेंबर २०१९ : शिंदेवाडी : २
११ एप्रिल २०२० : उरूल : २
१४ एप्रिल २०२० : घोटील : ४
२३ एप्रिल २०२० : बेलदरे : ४
१४ एप्रिल २०२० : सूर्यवंशीवाडी : ७
२ जून २०२० : गणेवाडी : ५
२० जून २०२० : सुपुगडेवाडी : २
३० ऑगस्ट २०२० : कऱ्हाड : ७
२३ ऑक्टोबर २०१९ कऱ्हाड : २
२४ नोव्हेंबर २०२० : हजारमाची : ३
५ जानेवारी २०२१ : घोट : ३
१२ जानेवारी २०२१ : टेंभू : १
३० मार्च २०२१ : रुवले : २
२५ एप्रिल २०२१ : विंग : १०
- चौकट
शिकार झालेले प्राणी
कासव : २
भेकर : २
बिबट्या : १
गवा : १
लांडोर : १
रानडुक्कर : ६
ससा : २
घोरपड : २
साळिंदर : ३
उदमांजर : २
धामण सर्प : १
अज्ञात : १
- चौकट
... अशी होते शिकार !
१) शिवारात पसरलेली जाळी
२) काही शिकारी फासे लावतात.
३) शिकारी कुत्र्यांचाही वापर होतो.
४) पक्ष्यांची शिकार छऱ्याच्या बंदुकीद्वारे होते.
- कोट
प्रत्येक प्राणी व पक्षी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असतो. हौसेखातर किंवा मेजवानीसाठी जर कोणी या प्राण्यांची व पक्ष्यांची शिकार करीत असेल, तर तो गुन्हा आहे. तसेच हे कृत्य निंदनीय असेच आहे. शिकारीची घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी.
- विलास काळे
वनक्षेत्रपाल, पाटण
फोटो : २७ केआरडी ०१
कॅप्शन : प्रतिकात्मक