सांगली : जिल्ह्यातील पाच हजार ९१९ कार्यरत शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांची सेवा अखंडित दहा वर्षे जिल्हा परिषदेकडे झाली आहे, त्या सर्वच शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पध्दतीने यंदाही होणार आहेत. याबाबतचे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदेला सोमवारी दिले आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते सातशे शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या होण्याची शक्यता आहे. या बदलीमधून ५३ वर्षांवरील सर्व शिक्षकांना वगळण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात एक हजार ६९८ जिल्हा परिषद शाळा असून, पाच हजार ६० शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी चार हजार ७३० शिक्षक कार्यरत असून ३२१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. कार्यरत शिक्षकांची जिल्हा परिषदेकडील सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झाली असेल, ते शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत. त्यानुसारच शिक्षकांच्या बदलीची ज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाने बदलीची प्रक्रिया सुरु केली आहे. दि. १३ ते २० मे या कालावधित शिक्षण विभागाने अवघड व सर्वसाधारण क्षेत्रामध्ये कार्यरत शिक्षकांची यादी तयार करणे, महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित करणे, बदलीपात्र शिक्षकांची शाळानिहाय नावांची यादी घोषित करण्यात येणार आहे. समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या शाळेतील जागांची यादी घोषित करताना मागीलवर्षी ज्या शाळांमध्ये समानीकरणासाठी रिक्त ठेवलेल्या जागा आहेत, त्यामध्ये शक्यतो बदल करू नये, नवीन संचमान्यतेमुळे जर बदल करणे अनिवार्य असेल, तरच अशा शाळांमध्ये सक्तीने रिक्तमध्ये बदल करावा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच २१ मे २०१९ पासून हरकतीवर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करायची आहे.बदलीपात्र शिक्षकांच्या ३१ मेपूर्वीच बदल्या करण्याचे ग्रामविकास विभागाचे धोरण आहे. शासनाच्या नवीन आदेशामुळे जिल्ह्यातील जवळपास सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.शिक्षकांनी बदल्यांची अचूक माहिती भरावी : नीशादेवी वाघमोडे-बंडगरराज्य शासनाकडून यावर्षीही आॅनलाईनच बदल्या होणार आहेत. यासाठी सर्वच शिक्षकांनी आपली माहिती संगणकीय प्रणालीवर नोंदणी करायची आहे. बदलीपात्र शिक्षकांनी शिक्षण विभागाकडून योग्य माहिती घेऊनच बदल्यांबाबतची माहिती संगणकीय प्रणालीवर भरायची आहे. यामध्ये सक्तीने रिक्त ठेवण्यात येणाºया शाळांची यादी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे असल्यामुळे तेथूनही तुम्ही माहिती घेऊ शकता. शिक्षकांनी अर्ज भरताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे-बंडगर यांनी केले.बदलीनंतर तीन वर्षे शिक्षकांना दिलासाबदलीपात्र शिक्षकाची संगणकीय प्रणालीद्वारे एकदा बदली झाल्यानंतर, पुन्हा तीन वर्षे ‘त्या’ शिक्षकाची बदली केली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने ८ मार्च २०१९ च्या शासन शुध्दीपत्रकात दिले आहेत. शासनाच्या नवीन आदेशामुळे गतवर्षी बदली झालेल्या दोन हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील ६५० शिक्षकांच्या होणार बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:25 PM