दत्ता यादवसातारा : लग्नातील अनिष्ट प्रथा खरंतर बंदच झाल्या पाहिजेत. चित्रपट आणि मालिकेतील लग्न सोहळ्याचे अनुकरण करून आपलाही लग्न सोहळा असाच पार पडावा, अशा अनेकांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. यामध्ये उत्साही युवकांचा आग्रह सर्वाधिक असतो. आनंदाच्या भरात एखादी झालेली चूक संपूर्ण लग्न सोहळ्यावर विरजन पाडते. अशा प्रकारे सातारा जिल्ह्यात पाच महिन्यांत सात विवाह माेडल्याने लग्नाच्या गाठी जुळण्यापूर्वीच तुटल्या.वाढत्या धनसंपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी सध्या अनावश्यक खर्चाने लग्न समारंभ साजरे केले जात आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांकडूनही याचे अनुकरण होऊ लागल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे लग्न, साखरपुडा यावरील अनावश्यक खर्च टाळून हे विधी पारंपरिक पद्धतीने करणे गरजेचे आहे. लग्न, साखरपुडा आदी समारंभावरील वाढता खर्च, त्यातील दारू मटणाच्या मांडव प्रथा वादाला कारण ठरत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये सात विवाह मोडण्यास लग्नातील उत्साही युवक कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. काहींनी लग्नसमारंभात दारू पिऊन शिंगाणा घातला तर काहींनी मानपानावरून वादावादी केली.
लग्नामध्ये होणारे अन्य अपप्रकार...लग्नात फटाक्यांची आतषबाजी करणे, कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक लावणे, जेवणाच्या वेळी होणारी अन्नाची नासाडी, अस्वच्छता, प्लास्टिक आणि थर्माकोल यांच्या थाळ्या अन् पेले यांचा वापर केल्याने होणारे प्रदूषण.
वधू-वरांवर अक्षता फेकल्या जाणे....मंगलाष्टकांच्या वेळी नातेवाइक आणि पुरोहित यांच्याकडून वधू-वर यांच्यावर अक्षता फेकल्या जातात. त्याऐवजी वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालून झाल्यावर आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या मस्तकावर अक्षता वाहू शकतो. अनेकदा या अक्षता एमेकांवर भिरकावल्या जातात. यातून वादावादीही होते.
हार घालण्यामध्ये पडलेला चुकीचा प्रघातवधूला हार घालता येऊ नये म्हणून नवरदेवाला उचलणे किंवा नवरदेवाला हार घालता येऊ नये म्हणून वधूला उचलणे, हा आणखी एक चुकीचा प्रघात पडला आहे. या चुकीच्या प्रकारामध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला जातो. गुरुजी हा सर्व प्रकार असाहाय्यपणे पाहत बाजूला उभे असतात. उपस्थितांपैकी लहान-थोरांकडून या सगळ्या प्रकारांना प्रोत्साहन दिले जाते. या प्रथा बंद झाल्या पाहिजेत.