ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 29 - कोयता व चाकूने मित्रावर वार होत असताना प्रत्यक्ष साक्षीदार असलेला मित्र न्यायालयात फितूर झाला. मात्र, न्यायालयाने वस्तूजन्य पुराव्याच्या आधारे तीन आरोपींना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुरज चंद्रकांत आटके (वय २०), सतीश भाऊ काळे (२०), अक्षय कालिदास गायकवाड (२०, सर्व रा. इंदिरानगर, लोणंद ता. खंडाळा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, निलेश किसन गोवेकर (२४,रा. कोरेगाव, ता. फलटण) हा दि. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास लोणंद येथील चौकात उभा होता. यावेळी सुरज आटके, सतीश काळे आणि अक्षय गायकवाड या तिघांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून निलेशवर डोक्यात आणि पोटामध्ये कोयता आणि चाकूने वार केले.
हा सारा प्रकार निलेशचा मित्र मंगेश अंकुश माने (२०) याने पाहिला होता. जखमी अवस्थेत निलेशला दवाखान्यात नेण्यात आले. लोणंद पोलीस ठाण्यामध्ये निलेशचा मित्र मंगेश माने याने या तिघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र, खटल्याच्या सुनावणीदरम्यान मंगेश हा फितूर झाला. तसेच १७ साक्षीदारांपैकी आठ साक्षीदारही फितूर झाले. परंतु आरोपींच्या आणि निलेशच्या कपड्यावरील तसेच शस्त्रावरील रक्ताच्या डागावरून हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.
लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी. के. किंद्रे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील एन. डी. मुके यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. खटल्यादरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने वरील तिघांना सात वर्षे सक्तमजुरी तसेच ३० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची ८५ हजारांची रक्कम जखमी निलेशला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. (प्रतिनिधी)