सातारा : खरीप पिकाच्या आधारावर दिवाळी साजरी करण्याचे बेत आखणाऱ्या शेतकऱ्यांना मुहूर्ताआधीच शिमगा करण्याची वेळ आली आहे. खरीप पिकांना ऐन वाढीच्या वेळेत पाणीच न मिळाल्याने या हंगामातील पिके कुचंबली, त्यामुळे उत्पादन घटण्याचे चिन्ह स्पष्टपणे दिसत असताना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप शासन पातळीवरुन झाले नसल्याने जिल्हा प्रशासनही हातावर हात धरुन बसले आहे. शेतकऱ्यांवर पावसासोबत सरकारही रुसल्याने त्यांना कोमात जाण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील सुमारे ४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. जून महिन्यातील पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे धाडस केले होते. पण जुलै, आॅगस्ट हे दोन्ही महिने कोरडे गेल्याने ऐन वाढीच्या वेळेत खरीप पिके कुचंबली आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, कांदा, ऊस या पिकांसोबत बागायत पिके घेतली जातात. तर पूर्वेकडील फलटण, कोरेगाव, खटाव, माण या कमी पर्जन्यमान असणाऱ्या तालुक्यांमध्ये सोयाबीन, बाजरी, मका, मूग, मटकी, ज्वारी, घेवडा, भुईमूग या पिकांची पेरणी केली जाते. यंदाही जूनमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले होते. पूर्व भागात मात्र पाऊस पडला नसल्याने अनेक ठिकाणी खरीप पिकांची पेरणीच झाली नाही. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या तिथे विहिरी, कालव्यांच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले; परंतु जिथे ही सोय नव्हती, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसावे लागले. जून महिन्यात पेरणी झाली. झालेल्या पावसाच्या आधारावर पिके काही प्रमाणात वाढली. पण जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने वाढच्या अवस्थेत असणारी पिके करपून गेली. पिकांची उंचीही खुटली. त्यामुळे साहजिकच खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट होण्याची चिन्हे आहेत, शेतकरीच त्याला दुजोरा देत आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांना प्रचंड महागाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू महिन्यात परतीच्या पावसाने दिलासा दिला असल्याने माळरानावरील गवत वाढले आहे. हे गवत जनावरांसाठी उपयुक्त ठरत असले तरी पावसाळ्यानंतर तेही उपलब्ध होणार नसल्याने जिल्ह्यात प्रचंड चारा टंचाई जाणवणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ७0 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पीक अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) कर्जाचे जोखड खांद्यावर! खरीप पिकांच्या नुकसानीबाबत सरकारने गांभीर्याने घेतलेले नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होऊन बसली आहे. पेरणीसाठी पैसे घातले. बियाणे, खते, मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी कर्जे काढली. आता ती फेडायची कशी? याचे प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विकास सेवा सोसायटीची कर्जे उचलली आहेत. या पिकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच शेतकरी हे कर्जे फेडत असतात. पण आता व्याजासकट पैसे फेडावे लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस जिल्ह्यातील शेतीसाठी वरदान ठरला असला तरी रब्बीच्या पेरणीसाठी कर्ज मिळविण्यासाठी पत कशी मिळवायची?, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. दिवाळीत सर्वसामान्यांचीही कंबर मोडणार खरीपातील उत्पादनाची घट दिवाळीच्या उत्सवावर परिणाम करणारी ठरणार आहे. रवा, बेसन, शेंगदाणे, सोयाबीन तेल यांच्या किंमती दिवाळीत भडकण्याची शक्यता आर्थिक तज्ञांचे मत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्यांची कंबर दिवाळीत मोडणार, हे निश्चित मानले जात आहे.
७० हजार हेक्टर शेती पंचनाम्याच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: September 19, 2015 11:50 PM