सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने राैद्ररूप धारण केले असून साताऱ्यातही संततधार सुरू आहे. यामुळे पश्चिमेकडील घाटमार्गात दरडी कोसळू लागल्यात. नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात येऊ लागलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयना येथे १६२ तर नवजाला १५७ मिलीमीटर झाला आहे. कोयनेतील साठाही ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.सातारा जिल्ह्याला २४ जुलैपर्यंत आॅरेंज अलर्ट आहे. त्यामुळे चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. विशेषत: करुन पश्चिमेकडे धो-धो पाऊस कोसळतोय. यामध्ये कास, बामणोली, ठोसेघर, कोयना, नवजा भागासह महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे धुकेही दाटून येत आहे. त्यातच पावसामुळे समोरील काहीच दिसत नाही. रस्त्यावरुन वाहन चालविणेही धाेक्याचे झाले आहे. वाहनधारकांना गाडीचे दिवे लावून जावे लागत आहे. त्यातच बुधवारीही सकाळपासूनच पश्चिम भागात पावसाचे राैद्ररूप दिसून आले. त्यामुळे माळराने आणि ओढेही भरभरून वाहत आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठ्यातही लक्षणीय वाढ होत चालली आहे.बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयनानगर येथे १६५ मिलीमीटर झाला आहे. तर आतापर्यंत एकूण २ हजार ८९४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजा येथे आतापर्यंत ३ हजार ३८५ मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला २४ तासांत १५७ तर एक जूनपासून २ हजार ८०१ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी सुमारे ५० हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठा ६८.८२ टीएमसी झालेला. सध्या धरण ६५ टक्क्यांवर भरलेले आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहाच्या एका युनीटमधून १ हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरूच आहे.
साताऱ्यात पहाटेपासून जोर..सातारा शहर आणि परिसरात बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार आहे. धो-धो पाऊस पडत आहे. सकाळच्या सुमारासही जोरदार पाऊस सुरूच होता. यामुळे नोकरदार तसेच शालेय विद्याऱ्श्यांना याचा फटका बसला. तर शहरातील सखल भागात पाणी साचले. पावसामुळे शहरातील रस्त्यावरही तुरळक प्रमाणात वाहने धावत होती.