सातारा : वंचित घटकांना मुख्य प्रावाहात आणण्याबरोबरच मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अडकलेल्या गरीब-गरजू कुटुंबांना ‘उमेद’ने बचत गटाच्या माध्यमातून मोठा आधार दिलाय. कारण, मागील ५ वर्षांत २ लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना ७०० कोटींचे अर्थसहाय्य दिले आहे, तेही अत्यल्प व्याजदरात. त्याचबरोबर शनिवारी तर एकाच दिवसात विकसित भारत संकल्प यात्रा विशेष मोहिमेत जिल्ह्यात ११ कोटींचे वाटप गटांना करुन आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.याबाबत माहिती अशी की, सध्या राज्यभर विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. या यात्रे दरम्यान शनिवारी जिल्ह्यातील बचतगटांना वेगवेगळ्या निधीबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदराचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले. याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी म्हणाले, जिल्ह्यात विविध मायक्रो फायनान्स कंपन्या २४ ते ३६ टक्के इतक्या भरमसाठ व्याजाने कर्ज वाटप करून गरजू आणि वंचित घटकांचे शोषण करत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांच्या विळख्यात अडकलेल्या घटकांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अऱ्थात उमेद अभियानने बचत गटाच्या माध्यमातून संघटित केले आहे. त्यांची सावकारी कर्ज भागवण्याबरोबरच खावटी गरजा पूर्ण करण्यासाठी ७ टक्के इतक्या अल्पदरात राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून बचत गटांना प्रतिगट दीड लाख ते ३ लाखांपर्यंत कर्ज पुरवठा केला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ७०० कोटी रुपये उमेद अभियानाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात महिलांना देण्यात आले आहेत. यातून महिलांनी उद्योग व्यवसायाची उभारणी करून स्वतःची उपजीविका वाढवली आहे. या कर्जाची परतफेडही नियमितपणे सुरू आहे.
उमेद अभियानात समाविष्ट गटांना प्रस्ताव सादर केल्यानंतर सर्व बँका तत्काळ सवलतीच्या व्याजदरामध्ये बँक कर्ज वितरण करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी मायक्रो फायनान्सच्या कर्जाच्या विळख्यात न अडकता ‘उमेद’ गटामध्ये समाविष्ट होऊन बँक कर्जाचा लाभ घ्यावा. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे संपर्क साधावा. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी