सातारा : मे महिन्याला अद्याप दोन महिने बाकी असतानाच जिल्ह्यातील तब्बल ७०४ गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याचे समोर आले असून, या गावांमध्ये तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शासनाला नुकताच आराखडा सादर केला आहे.जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईचे मोठे संकट आवासून उभे राहात असते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून खासगी टँकर आणि विहिरींचे अधिग्रहण करण्यात येते. यंदा १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यातूनही नागरिकांना पाणी टंचाईची झळ पोहोचत असेल तर टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. २८८ गावांनी टँकरची मागणी केली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात तब्बल ७०४ गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत असल्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या सर्र्वेक्षणात निष्पन्न झाले आहे.गेल्या महिनाभरापासून हा टंचाईचा आढावा घेणे सुरू होते. यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत मागणी अर्ज घेण्यात आले होते. आगामी जिल्हा नियोजन बैठकीत हा आराखडा मंजूर झाल्यानंतर टंचाई गावांमध्ये उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक १५४ गावांमध्ये तर सर्वात कमी खंडाळा तालुक्यात केवळ १२ गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती आहे. पाण्याच्या टंचाईचा आराखडा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून, हा आराखडा नुकताच शासनाला सादरही करण्यात आला आहे.
पाणी टंचाई भासणारी गावेमाण-९३, खटाव-१०३, कोरेगाव-१५४, खंडाळा-१२, फलटण-५७, वाई-४३, पाटण-२७, जावळी-३६, महाबळेश्वर-५१, सातारा-३२, कऱ्हाडमधील ९६ गावांचा पाणी टंचाईमध्ये समावेश आहे.