सातारा : सातारा पालिका हद्दीमधील बिगर निवासी मिळकतदारांना पालिकेने सुखद धक्का दिला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या वार्षिक बिलापैकी तीन महिन्यांच्या मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एकूण ६ हजार ६९७ मिळकतींना ७१ लाख ५७ हजार १३ रुपयांची सूट देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटात व्यावसायिकांच्या बिगर निवासी घरपट्टीमध्ये तीन महिने सूट देणारी सातारा ही बहुधा पहिलीच पालिका असावी. गेल्या वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनसुध्दा कोरोना या संसर्गजन्य रोगाचे थैमान सुरूच आहे. लॉकडाऊन, अनलॉक, ब्रेक द चेन अशा संकल्पना राबतिताना, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह सर्व व्यावसायिक मेटाकुटीला आलेले आहेत. त्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन शासनाकडे बिगर निवासी आणि निवासी मळकतींच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्या प्रस्तावाचा सुद्धा पाठपुरावा सुरू आहे. त्या प्रस्तावावर संवेदनशीलतेने निर्णय होणे अपेक्षित आहे.
तोपर्यंत स्वस्थ न बसता, नगरपरिषदेच्या कायद्यातील तरतुदींचा सकारात्मकतेने अन्वय लावून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील बिगर निवासी मिळकतींचा एक तिमाही मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सातारा पालिकेने सुरू केली आहे. याचा लाभ प्राथमिक माहितीनुसार ६ हजार ६९७ बिगरनिवासी मिळकतधारकांना मिळणार आहे. या बिगर निवासी मिळकतींचा एकूण ७१ लाख ५७ हजार रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळविणे आणि प्रशासकीय बचत या दोन मुख्य स्त्रोतांव्दारे ही होणारी तूट भरून काढण्याचेही नियोजन करण्यात आलेले आहे. तीन महिन्यांच्या सवलतीची रक्कम वजा करून मिळकतकरांची मालमत्ताकर बिले तयार करण्यात येणार आहेत.
(कोट)
सातारा विकास आघाडीचे प्रमुख व खासदार उदयनराजे भोसले यांनी करमाफीबाबत आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, पालिकेकडून बिगर निवासी मिळकतींना करात सूट देण्यात आली आहे. संकटकाळात दिलासा देण्याचे काम प्रशासनाने केले आहे.
- माधवी कदम, नगराध्यक्षा
(कोट)
खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वसामान्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. कोरोनासारख्या भीषण संकटाने अनेकांनी आर्थिक घडी विस्कटली आहे. या परिस्थितीत करमाफीचा निर्णय घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वसामान्यांना सुखद धक्का दिला आहे.
- मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष
लोगो : सातारा पालिकेचा फोटो वापरणे